स्फोटके तयार करण्यात सहभाग, दहशतवाद्यांना घरात आश्रय

नवी दिल्ली : पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी अटक केली. या दहशतवाद्याचे नाव शाकीर बशीर मगरे असे असून तो लाकडी सामानाच्या दुकानाचा मालक आहे. पुलवामातील काकपोराच्या हाजीबलचा तो रहिवासी आहे. त्याने आत्मघातकी हल्लेखोर आदिल अहमद दार याला घरात आश्रय दिला होता. स्फोटके तयार करण्यासाठीही मदत केल्याचे त्याने कबूल केले. पाकिस्तानचा दहशतवादी मोहम्मद उमर फारुक याने मगरे याची दारशी ओळख करून दिली होती. त्यानंतर मगरे हा पूर्णवेळ ‘जैश’चे काम करीत होता. आपण अनेकदा शस्त्रे, स्फोटके, रोख रक्कम आणि स्फोटक साहित्याची पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्यांना देवाणघेवाण केल्याचे मगरे याने मान्य केले.