पाकिस्तानात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या शासनाने अद्याप सूत्र हाती घेतली नसली तरीही, भारताशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आह़े  त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी पाकिस्तानने ५१ मच्छिमारांची विनाअट सुटका केली आह़े  तसेच भारताकडूनही अशाच प्रकारची कार्यवाही होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आह़े
पाकिस्तानचे पंतप्रधान मीर हझर खान खूसो यांनी, शिक्षा भोगून झालेल्या भारतीय मच्छिमारांची मानवतेच्या दृष्टिकोनातून सुटका करण्याचा निर्णय घेतल्याचे पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या निवेदन पत्रात म्हटले आह़े  भारताकडूनही पाकिस्तानी मच्छीमारांची मुक्तता करण्यात येईल, अशी अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केली आह़े  या मच्छीमारांचे स्वदेश प्रत्यावर्तन कधी करण्यात येणार याबाबत मात्र या निवेदनात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही़
मच्छिमारांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्या त्या बैठकीत, पाकचे कायदे मंत्री अहमेर बिलाल सुफी, सिंधचे मुख्यमंत्री जहीद कुर्बान अल्वी आणि इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होत़े
या बैठकीत खोसो यांनी माहिती दिली की, पाकिस्तानच्या तुरुंगांत सध्या ४८२ भारतीय कैदी आहेत, तर भारतीय तुरुंगात ४९६ पाकिस्तानी कैदी आहेत़  इतरही भारतीय कैद्यांच्या अवस्थेच्या माहितीची खातरजमा होण्याची आम्ही प्रतिक्षा करीत असल्याचेही त्यांनी सांगितल़े  भारतीय कैद्यांना मायदेशी पाठविण्यासाठी आणि पाकिस्तानी कैद्यांच्या परतीसाठी भारताशी बोलणी करण्याच्या सूचना या वेळी खोसो यांनी केल्या़
पाकिस्तानच्या बंदीवासात मृत्यू झालेल्या सरबजित आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून भारतीय तुरुंगात पाकिस्तानी कैद्यांचा मारहाणीने झालेला मृत्यू़  या पाश्र्वभूमीवर दोन्ही देशांकडून आता कैद्यांना स्वदेशी आणण्याच्या प्रयत्नांना वेग येत आह़े