पाकिस्तानने भारताच्या विरोधात एक नवा मुद्दा उकरून द्विपक्षीय संबंधांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम केले आहे. सुरक्षा नियमांना डावलून नियंत्रण रेषेवर (एलओसी) संरक्षक भिंत बांधण्याची तयारी भारताने सुरू केल्याचा आरोप करीत पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेकडे भारताच्या विरोधात तक्रार केली आहे.

पाकिस्तानच्या राजदूत मलेहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष विटली चुर्कीन यांना याबाबत पत्र लिहीले आहे. या पत्रात भारत जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर १० मीटर उंच, १३५ फूट रुंद अशी जवळपास १९७ किलोमीटर लांबीची भिंत बांधण्याची भारत तयारी करत असल्याचे नमूद केले आहे.

दरम्यान, लोधी यांच्या पत्रावर त्वरित प्रतिक्रिया देणे भारताने टाळले आहे. लोधी यांच्या आरोपांना योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ सध्या न्यूयॉर्कमधील एकाच हॉटेलात वास्तव्याला असल्याने उभय नेते परस्परांना भेटण्यासंदर्भात विविध तर्काना उधाण आले होते. मात्र, लोधी यांच्या या पत्रव्यवहारामुळे मोदी-शरीफ भेटीची शक्यता आता धुसर झाली आहे.