नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनावर काबू मिळवण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न असला तरी, रविवारी रामलीला मैदानावर होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर या आंदोलनाचे सावट असेल. त्यातच आता या सभेमध्ये पंतप्रधानांना पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दिल्लीची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने जंगी सभा आयोजन केलं असून या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलीस आणि विशेष सुरक्षा दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

“रविवारच्या या सभेसाठी सुरक्षेची व्यवस्थेची योग्य काळजी घेतली जावी. पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी ‘ब्लू बुक’मधील समाविष्ट सूचनांची अंमलबजावणी करावी,” असे निर्देश केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी संबंधित संस्थांना दिले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे दहशतवादी कार्यरत असून रामलीला मैदानात होणाऱ्या मोदींच्या कार्यक्रमामध्ये ते घातपात घडवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या सभेला सामान्य नागरिकांची आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

रामलीला मैदानावरील या सभेच्या सुरक्षेची जबाबदारी ही विशेष सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांकडे आहे. या सभेला मोदींबरोबरच केंद्रीय मंत्रीमंडळातील बरेच बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजपा आक्रमक प्रत्युत्तराच्या तयारीत

अनुच्छेद ३७०, तिहेरी तलाक, आता नागरिकत्व दुरुस्ती अशा अनेक मुद्दय़ांमुळे मुस्लिमांमध्ये भाजपबद्दल असंतोष होता. हे मुद्दे घेऊन काँग्रेस आणि आप मुस्लिमांच्या समर्थनार्थ आंदोलन करतील याचा अंदाज भाजपला होता. त्यामुळे भाजपने आत्तापर्यंत बघ्याची भूमिका घेतली होती. मात्र, हळूहळू आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मोदींची सभा होणारच…

आंदोलनामुळे दिल्लीचे वातावरण ढवळून निघत असले तरी मोदींची सभा होणारच, असे भाजपचे दिल्लीचे संघटक प्रभारी शाम जाजू यांनी सांगितले. ही सभा दिल्लीतील अनधिकृत बांधकामांना रीतसर केल्याच्या मुद्दय़ावर घेण्यात येणार असली तरी, मोदींच्या उपस्थितीमुळे आंदोलकांना प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. या सभेनंतर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत भाजप अधिक आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे समजते.