गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेने पाकिस्तानला सातत्याने आर्थिक मदत केली. मात्र, या मोबदल्यात पाकिस्तानने आम्हाला कपट आणि फसवणुकीशिवाय काहीच दिले नाही, अशी खरमरीत टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांनी सोमवारी संध्याकाळी केलेल्या या ट्विटमुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेने मुर्खाप्रमाणे २०१२ पासून पाकिस्तानला तब्बल ३३०० कोटी डॉलर्सची मदत देऊ केली. मात्र, त्या मोबदल्यात आम्हाला काय मिळाले तर कपट आणि फसवणूक. यावेळी ट्रम्प यांनी दहशतवादाला पाठबळ पुरवण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवरही ताशेरे ओढले. पाकिस्तानने त्यांच्या देशात दहशतवाद्यांना आश्रय दिला आणि आम्ही शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत राहिलो. यासाठी पाकिस्तानने आम्हाला थोडीफार मदतही केली. मात्र, यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगत ट्रम्प यांनी भविष्यात पाकिस्तानला आर्थिक मदत न करण्याचे संकेत दिले. अमेरिकेकडून येत्या काही दिवसांतच पाकिस्तानला तब्बल २५५०० कोटी डॉलर्सची मदत देण्यात येणार होती. मात्र, ट्रम्प प्रशासनाचा या मदतीला विरोध होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.

अमेरिकेच्या या कठोर पवित्र्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या पाकिस्तानने लगेचच आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. लवकरच सत्य परिस्थिती संपूर्ण जगासमोर येईल. आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्विटरवरून उपस्थित केलेल्या मुद्द्यावर लवकरच भूमिका स्पष्ट करू. तसेच सत्य आणि काल्पनिक गोष्टींमधला फरक जगासमोर आणू, असे ट्विट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले.

अमेरिकेने दक्षिण आशियाबद्दलचे धोरण स्पष्ट केल्यापासूनच अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात काहीप्रमाणात वितुष्ट आले होते. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याने पाकिस्तानातील आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा केल्यानंतरही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी पाकिस्तान हा गोंधळ, हिंसा आणि दहशतवाद पसरवणाऱ्यांचा आश्रयदाता असल्याचे ट्विट ट्रम्प यांनी केले होते.