पाकिस्तानकडून पूँछमध्ये भारतीय सैन्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून या सगळ्याला सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्याच्यावेळी शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर आणि नायब सुभेदार परमजीत सिंग यांचे मृतदेह छिन्नविछिन्न करण्याच्या पाकच्या घृणास्पद कृत्यावर सध्या तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाकिस्तानच्या या कृतीमुळे त्यांनी स्वत:च्या विनाशाला निमंत्रण दिले आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केली. तर केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनीदेखील पाकच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला. शांततेच्या काळात तर सोडाच मात्र युद्धाच्यावेळीही अशाप्रकारची अमानवी कृती घडत नाही. जवानांच्या मृतदेहाची अशाप्रकारे विटंबना करणे ही रानटी कृती आहे. भारतीय लष्कर याला सडेतोड प्रत्युत्तर देईल, याचा संपूर्ण देशाला विश्वास आहे. त्या दोन जवानांचे बलिदान वाया जाणार नाही, असे जेटली यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर आता भारत पाकविरुद्ध काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पूँछमधील ही घटना ताजी असतानाच दुपारच्या सुमारास कुलगाम येथेही दहशतवाद्यांनी एका बँकेच्या एटीएम व्हॅनवर गोळीबार केला. यामध्ये पाच पोलीस आणि दोन बँक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्यावेळी दहशतवाद्यांनी पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांना एटीएम व्हॅनमधून बाहेर खेचून गोळ्या घातल्या. त्यानंतर दहशतवादी ५० लाख रूपयांची रोकड आणि पोलिसांची शस्त्रे घेऊन पळून गेले. या दोन घटनांनंतर आता सीमारेषेवरील तणाव वाढला आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत श्रीनगरमध्ये दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही या संपूर्ण हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.

भारतीय सैन्याच्या उत्तर कमांडकडून याबद्दलची माहिती प्रसिद्ध करण्यात आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या कृतीचा तीव्र निषेध केला असून याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाक सैन्याने सीमारेषेवरील भारतीय चौक्यांवर रॉकेट आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्यानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी पाकिस्तानी सैन्याने लष्करी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केले. त्यांनी गस्तीवर असलेल्या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. पाकिस्तानच्या या घृणास्पद कृत्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आला आहे.