‘पाकिस्तान हा खूप स्वस्त देश आहे. त्यामुळे मलेशियासारख्या देशात जाण्याऐवजी तू पाकमध्ये ये’….. हे संभाषण आहे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी काम करणाऱ्या मोहम्मद शफी आणि आयएसआयचा हस्तक शमशूल होडामधील. भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या तपासात हे संभाषण उघड झाले असून आयएसआय भारतातील हस्तकांना पाकिस्तानमध्ये येण्यासाठी काय आमिष देते हे यातून दिसते.

नोव्हेंबर २०१६ मध्ये कानपूरमध्ये रेल्वे अपघात घडवून आणण्यात शमशूल होडा (४८) याचा हात होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार होडा हा आयएसआयचा भारतातील हस्तक असून पाकमध्ये आयएसआयसाठी काम करणाऱ्या मोहम्मद शफीशी तो संपर्कात होता. शफीने होडाला पाकमध्ये यायला सांगितले होते. जुलै २०१६ मधील होडा आणि शफी यांच्यातील फोनवरील संभाषण भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले आहे. यात शफी म्हणतो, ‘काय झालं? तू अजून बोलला नाहीस का? तुला काही मदत लागली तर सांग. जर तू मलेशियाला जाणार असशील तर त्यापेक्षा तू पाकिस्तानला ये. पाकिस्तानमध्ये सर्वच गोष्टी खूप स्वस्त आहेत, मलेशिया खूप महागडा देश आहे. त्यापेक्षा तू पाकिस्तानमध्येच ये.’

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शफीविरोधात गुन्हा दाखल केला असून भारतात बनावट नोटा पाठवण्यात त्याचा सहभाग असतो. भारतातील रेल्वे मार्गांवर घातपात घडवण्यासाठी त्याने परदेशी चलन भारतात पाठवले होते.

दरम्यान, होडा हा मूळचा नेपाळचा असून नेपाळ पोलिसांच्या पथकाने गेल्या वर्षी ७ फेब्रुवारी रोजी नेपाळमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्याला अटक केली होती. पोलिसांनी त्याला दुबईतून नेपाळला आणले आणि या कामात नेपाळमधील सुरक्षा यंत्रणांनी इंटरपोलची मदत घेतली. २०१६ मध्ये कानपूरमधील रेल्वे घातपात प्रकरणाचा तो सूत्रधार असल्याची माहिती उघड झाली होती. या अपघातात १५० जण ठार झाले होते. होडाला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  होडा आणि शफीने मलेशियात हा कट रचला होता, असे एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे.

बिहार पोलिसांनी गेल्या वर्षी जानेवारीत या प्रकरणी तीन जणांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीतून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय भारतीय रेल्वेला लक्ष्य करत असल्याची माहिती समोर आली होती.