पाकिस्तानने काही संशयित संघटनांच्या नावांची यादी तयार केली असून त्यामध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याच्या नेतृत्वाखालील जमात-ऊद-दावा या संघटनेचा समावेश आहे. जमात-ऊद-दावा संघटनेच्या कारवायांवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने येथे स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या वरिष्ठ प्रतिनिधीगृहात गुप्तचर यंत्रणा आणि काही निवडक गट या बाबत चर्चा सुरू असताना पाकिस्तानचे अंतर्गतमंत्री बलीघूर रेहमान यांनी ही माहिती दिली.जमात-ऊद-दावाचा संशयित संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सदर संघटना धर्मादायाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामात सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे रेहमान यांनी स्पष्ट केले.
जमात-ऊद-दावा या संघटनेवर २००८ मध्ये बंदी घालण्यात
आली. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१० मध्ये या संघटनेला केवळ धर्मादाय कामकाज करण्याची अनुमती देण्यात आली, असेही मंत्र्यांनी सांगितले. तथापि,
अंतर्गत मंत्रालय या संघटनेच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहे, असेही ते म्हणाले.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रतिनिधी फरहतुल्लाह बाबर यांनी सदर मुद्दा उपस्थित केला. बंदी घालण्यात आलेल्या संघटनेला विविध कारणास्तव धर्मादाय संघटना म्हणून काम करण्याची अनुमती दिल्याने दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या देशाच्या विश्वासार्हतेला तडा जातो, असे बाबर म्हणाले.