पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत नाही असं सांगत पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी पुलवामासंबंधी आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. “पाकिस्तान कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा देत नसून, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला,” असं त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं आहे.

“माझं वक्तव्य स्पष्ट होतं. भारताने पाकिस्तानात घुसून बालकोटमध्ये कारवाई केल्यानंतर करण्यात आलेल्या स्विफ्ट रिसॉर्ट ऑपरेशनबद्दल मी बोलत होतो. पुलवामा नंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ऑपरेशनबद्दल मी सांगत होतो,” असं त्यांनी म्हटलं आहे.

फवाद चौधरी यांनी गुरुवारी जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील २०१९ सालच्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार होता, अशी खळबळजनक कबुली दिली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यामुळे दोन्ही देशांनी युद्धाच्या उंबरठय़ावर आणून ठेवलं होतं.

आणखी वाचा- पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांना का घाम फुटला होता?, माजी एअर फोर्स प्रमुख म्हणाले…

‘आम्ही हिंदुस्थानला घरात घुसून मारले. पुलवामातील आमचे यश हे इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील या देशाचे यश आहे. तुम्ही- आम्ही सर्वजण या यशाचा भाग आहोत’, असं फवाद चौधरी यांनी नॅशनल असेम्ब्लीतील चर्चेदरम्यान सांगितलं.

मात्र वक्तव्यावरुन टीका होऊ लागल्यानंतर फवाद चौधरी यांनी यु-टर्न घेतल्याचं दिसत आहे. आपण पुलवामा झाल्यानंतर भारताला जेव्हा आम्ही घऱात घुसून मारलं असं सांगत सावरण्याचा प्रयत्न केला आहे. आपण दहशतवादाचा निषेध करत असून निर्दोषांची हत्या करत नाही असं ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- पाकिस्तान : काश्मीर प्रश्नावरील Webinar मध्ये लागले ‘जय श्रीराम’चे नारे; पाहा Video

भारत हल्ला करेल या भीतीनेच पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली, असे वक्तव्य पाकिस्तान मुस्लीम लीग- नवाझ (पीएमएल) पक्षाचे नेते अयाझ सादिक यांनी सांगितल्याच्या दुसऱ्याच दिवशी, पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी असलेले चौधरी यांनी हे कबुलीदर्शक विधान केलं. पुलवामा हल्ल्याच्या वेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री असलेले चौधरी यांनी सादिक यांचं वक्तव्य ‘अयोग्य’ असल्याचे सांगून त्यावर टीका केली.