पाकिस्तानने अवघ्या पाच दिवसात आपल्या भूमिकेवरुन यु-टर्न घेत भारतीय विमानांसाठी हवाई हद्द खुली करण्याचा निर्णय जाहीर केला. पाकिस्तानने उदात्त भावना मनात ठेऊन सदभावनेच्या हेतूने हा निर्णय घेतलेला नाही. त्यामागे पाकिस्तानची ढासळती आर्थिक परिस्थिती हे खरे कारण आहे. भारताने सीमारेषेजवळच्या फॉरवर्ड पोस्टवरुन फायटर विमाने मागे घेतली तरच भारताच्या नागरी विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द खुली करु असे पाकिस्तानचे हवाई सचिव शाहरुख नुसरत यांनी नुकतेच संसदीय समितीला सांगितले होते.

भारताने पाकिस्तानची ही मागणी मान्य केली नाही तरीही पाकिस्तानने मध्यरात्री नोटीस जारी करुन तात्काळ प्रभावाने पाकिस्तानची हवाई हद्द सर्व प्रकारच्या नागरी विमानांसाठी खुली करण्यात येत असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांचे नुकसान होत होते हे खरे असले तरी पाकिस्तानलाही याचा आर्थिक फटका सहन करावा लागत होता.

पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्यामुळे दररोजच्या ४०० विमानांच्या ऑपरेशन्सवर परिणाम झाला होता. पाकिस्तानात  हवाई हद्द वापरणाऱ्या तसेच दुरुस्ती, इंधन भरण्यासाठी लँडिंग करणाऱ्या विमानांवर रक्कम आकारली जाते. विमानाचे आकारमान आणि क्लासनुसार हे दर बदलत जातात. त्यातून पाकिस्तानला चांगले पैसेही मिळतात.

सध्याच्या स्थितीत पाकिस्तानसाठी पैसे अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. बोईंग ७३७ विमानाच्या लँडिंग आणि नॅव्हीगेशनसाठी पाकिस्तानात दर दिवसाला ६०० ते ७०० डॉलर आकारले जातात. जवळपास ४०० विमाने दररोज पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करायची. त्यातून पाकिस्तानला दिवसाला तीन लाख डॉलरचे उत्पन्न मिळायचे.

त्याशिवाय भारताने पाकिस्तानच्या नागरी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केल्यामुळे पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना साडेचार लाख डॉलरपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागले. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानला हा आर्थिक फटका परवडत नव्हता. त्यामुळेच पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द खुली करण्याचा निर्णय घेतला.