करोनाचा फैलाव संपूर्ण जगभरात झाला असून पाकिस्तानमध्येही थैमान घातला आहे. करोनासोबत लढण्यासाठी इम्रान खान सरकारने आता भारताकडे मदत मागितली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्यची मागणी केली आहे. याआधी अमेरिका आणि ब्राझीलने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध करोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतं असा अंदाज असल्याने सर्वच देशांमध्ये सध्या या औषधाला प्रचंड मागणी आहे.

भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसाठी मदत मागणाऱ्या देशांमध्ये आता पाकिस्तानचाही समावेश झाला आहे. पाकिस्तानमध्ये करोनाचे सहा हजार रुग्ण सापडले असून १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

याआधी इम्रान खान यांनी पाकिस्तानला मदतीचं आवाहन करणार एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की, “आंतरराष्ट्रीय समुदाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांना माझं आवाहन आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं”.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय ?

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या आहेत त्यांचा वापर स्वप्रतिकारशक्ती कमी झाल्याने होणाऱ्या रोगात केला जातो. मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या क्लोकोक्विन या गोळीच्याच प्रजातीचे हे औषध आहे. पण त्याचा वापर हृदयाच्या संधीवातावर केला जातो. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी २१ मार्चला या गोळ्यांचा वापर करण्याचे सुचवल्याने त्याला महत्व आले. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचा वापर अ‍ॅझिथ्रोमायसिन बरोबर केला तर करोनावर चांगला उतार पडतो असा दावा ट्रम्प यांनी केला होता.