इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ आणि धर्मगुरू ताहीर उल कादरी यांच्या पाकिस्तान आवामी तेहरीक या पक्षांनी छेडलेल्या आंदोलनापुढे पाकिस्तान सरकारने गुरुवारी नमते घेतले. कादरी यांच्या १४ समर्थकांच्या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर काही तासांत पाकिस्तान पोलिसांनी पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांचे बंधू शाहबाज यांच्यासह केंद्रातील मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आता शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी इम्रान खान आणि कादरी हे दोघेही अधिक आक्रमक बनले आहेत.
कादरी यांच्या पक्षाच्या १४ कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी शरीफ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पाकिस्तान आवामी तेहरीक पक्षाने आंदोलन छेडले आहे. मात्र, जोपर्यंत कादरी इस्लामाबादमध्ये चालवलेले आंदोलन मागे घेत नाहीत, तोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान सरकारने घेतली होती. मात्र, लाहोर उच्च न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणी २१ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सरकारचा नाईलाज झाला व शरीफ यांच्यासह त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले.
 यात पंतप्रधानांचे बंधू व पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ, त्यांचा मुलगा हमझा, अंतर्गत सुरक्षा मंत्री चौधरी नासिर अली, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, माहिती मंत्री परवेझ रशीद, रेल्वेमंत्री साद रफीक, राज्यमंत्री आबिद शेर अली, पंजाबचे माजी कायदा मंत्री राणा सनाउल्लाह आदींचा समावेश आहे. मॉडेल टाउन येथील कादरी यांच्या कार्यालयात पोलिसांनी १७ जून रोजी घातलेल्या छाप्यात व केलेल्या गोळीबारात दोन महिलांसह १४ जण ठार झाले होते. सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.
त्यामुळे कादरी यांनी आता यापुढे आंदोलन चालवणे योग्य नाही, अशी भूमिका शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने मांडली. परंतु, सरकारने गुन्हे दाखल केले असले तरी त्यात दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हे नोंदवलेले नाहीत, असा मुद्दा उपस्थित करत कादरी यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 तथापि, पाकिस्तानी पोलिसांनी शरीफ आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
यात माझ्या मंत्रिमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मॉडेल टाऊन घटनेसंदर्भात आपण भविष्यात चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केले.

माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यात माझ्या मंत्रिमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मॉडेल टाऊन घटनेसंदर्भात आपण भविष्यात चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत.
– नवाझ शरीफ, पाक पंतप्रधान