अनंतनाग तुरूंगात कैद असलेल्या शमशूल वकारला सोडवण्यासाठी पाकिस्तानचे दहशतवादी सागरी मार्गाने भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. नवभारत टाइम्सने गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. गुप्तचर यंत्रणेला मिळेलेल्या माहितीनुसार, सीमारेषेवर दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात सतत अपयश येत असल्यामुळे सागरी मार्गाने आक्रमण करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याची तयारी म्हणून पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय दहशतवाद्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देत आहे. याबरोबरच सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय लष्करावर दहशतवादी आयईडी ब्लास्ट करू शकतात अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर गुप्तचर यंत्रणाने सावधानतेचा इशारा दिला आहे. सागरी मार्गाने दहशतवादी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. अनंतनाग तुरुंगात कैद असलेल्या शमशूल वकारला या दहशतवाद्याला सोडवण्यासाठी पाकिस्तानने योजना आखली आहे.

सागरी किनाऱ्यावर पाकिस्तानी नौदल दहशतवादी आणि घुसखोरांना प्रशिक्षण देत आहे. त्यांच्याकडून नवीन तंत्रज्ञान कसे वापरावे याचा अभ्यास करून घेतला जात आहे. गुप्तचर यंत्रणेनुसार, दहशतवादी भारताच्या कार्गो शिप, इंडियन पोस्ट आणि ऑईल टँकर्सला लक्ष्य करू शकते. सागरी मार्गाने हल्ल्यासाठी पाकिस्तान भारतीय मासेमारी नौकांचा वापर करणार आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने गुजरात एसआयबी, पोलीस, गृह मंत्रालय, लष्कर आणि बीएसएफला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.