पाकिस्तानमधील एका मंत्र्याने हिंदूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याची मंत्रीमंडळामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. फय्याज अल हसन चौहान असे या मंत्र्याचे नाव असून काल त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. फय्याज हे पंजाब प्रांतामधील सरकारमध्ये माहिती आणि सांस्कृतिक मंत्री होते.

फय्याज यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये, ‘हिंदू समाज हा गोमुत्र पिणारा समाज आहे’ असे वक्तव्य केले होते. याच पत्रकार परिषदेमध्ये भारतात पाकिस्तानचा सामना करण्याची हिंमत नाही, असं वक्तव्य फय्याज यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाबरोबरच फय्याज यांच्यावर स्वपक्षीय नेत्यांनीही टिका केली. मानवाधिकार मंत्री शिरीन माजरी यांनीही फय्याज यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. सत्तेत असणाऱ्या इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक ए इंसाफ’ने (पीटीआय) पक्षाने फय्याज यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात येत होती. ट्विटवरही पाकिस्तानमधील नेटकऱ्यांनी फय्याज यांची हकालपट्टी करा अशा आक्षयाचा #sackfayazchohan हा हॅशटॅगही ट्रेण्ड होत होता. अखेर फय्याज यांना होणारा वाढता विरोध पाहून पंजाब सरकारने फय्याज यांना राजीनामा देण्यास सांगितले. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी फय्याज यांना बोलावून घेतले. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील ‘तहरीक ए इन्साफ’ या पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यात कुठलाही धार्मिक भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दात बुजदार यांनी फय्याज यांना सुनावले. यानंतर त्यांनी फय्याज यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. सरकारच्या आदेशानंतर फय्याज यांनी काल (मंगळवार, ५ मार्च) रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

ते वक्तव्य मोदींबद्दल असल्याची सारवासारव

फय्याज यांच्या वक्तव्याला सर्वच स्तरामधून विरोध होऊ लागल्यानंतर काल फय्याज यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय सैन्य आणि भारतातील प्रसारमाध्यमांबद्दल बोलताना आपण ते वक्तव्य केले होते. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंना दुखावण्याच्या उद्देशाने मी कोणतेही वक्तव्य केले नव्हते. जर माझ्या वक्तव्याने पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या भावाना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो, अशा शब्दात फय्याज यांनी प्रसारमाध्यमांसमोर वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.