भाजपचे नेते राकेश सिंह यांच्या निवासस्थानी प्रवेश करण्यापासून मंगळवारी कोलकाता पोलिसांना रोखण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भाजपची युवा कार्यकर्ती पामेला गोस्वामी यांनी अमली पदार्थ प्रकरणात राकेश सिंह यांचा संबंध असल्याचा आरोप केला आहे.
भाजपच्या राज्य समितीचे सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्ती असलेले राकेश सिंह यांच्या निवासस्थानी पोलीस पोहोचले होते, मात्र राकेश सिंह यांचा पुत्र साहेब यांनी पोलिसांना अडविले आणि घरात येण्याची परवानगी असल्याबद्दलची कायदेशीर कागदपत्रे दाखविण्याची मागणी त्यांनी केली.
त्यानुसार सिंह यांच्या कुटुंबीयांना आम्ही सर्व कागदपत्रे दाखविली आणि आम्ही कायद्यानुसारच काम करीत असल्याचे आम्ही त्यांना सांगितले, असे पोलिसांनी सांगितले. सिंह यांना पोलीस मुख्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले, मात्र दिल्लीला कामानिमित्त जात असून २६ फेब्रुवारी रोजी परतल्यावर पोलिसांसमोर हजर होऊ असे त्यांनी सांगितले.
पामेला गोस्वामी यांचे आरोप
पर्समध्ये आणि गाडीत ९० ग्रॅम कोकेन मिळाल्यानंतर भाजयुमोच्या राज्य सरचिटणीस पामेला गोस्वामी, त्यांचा मित्र प्रबीरकुमार डे आणि गोस्वामी यांच्या सुरक्षारक्षकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर गोस्वामी यांनी राकेश सिंह यांचे नाव घेत त्यांनीच आपल्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:00 am