एकीकडे खाप पंचायतीचे निर्णय जनसामान्यांच्या दृष्टीने जाचक ठरत असताना, येथील राहेरा गावच्या महापंचायतीने मात्र समाजातील विकृती ठेचून काढणारे निर्णय घेतले आहेत. बालविवाह करू नका, विवाहादरम्यान डीजे आणि मोठ्ठे ध्वनिवर्धक लावू नका, हुंडा आणि जुगार टाळा असे निर्णय येथील यादव जमातीच्या महापंचायतीने रविवारी झालेल्या बैठकीत घेतले आहेत.
उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये अजूनही हुंडय़ासारख्या घातक प्रथा सुरू आहेत. मात्र त्या बंद करण्यासाठी आम्ही समाज म्हणून पावले उचलण्याचा निर्धार केला, अशी माहिती यादव जमातीचे प्रमुख आणि महापंचायतीचे अध्यक्ष उदय सिंग यांनी दिली. विवाहादरम्यान कन्यादान करणाऱ्या पित्याने २१ हजारांपेक्षा अधिक रक्कम भेट म्हणून देऊ नये, मद्यपान करू नये, बालविवाह टाळावेत असे निर्णय या वेळी पंचायतीच्या सभेत घेण्यात आले. तसेच या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस ११ हजार रुपये दंड ठोठाविण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला आहे. तसेच असे गुन्हे निदर्शनास आणून देणाऱ्या व्यक्तीस रोख २१०० रुपयांचे इनामही जाहीर करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थानातील ५२ गावांमधील यादव जमातीचे प्रतिनिधी या महापंचायतीच्या सभेस हजर होते.