विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या कारवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थी कार्यकर्त्यांनी काळे फासत ‘आतंकवादी’ असे लिहिल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना बैठकीच्या खोलीत बराच काळ कोंडूनही ठेवले. झारखंडमधील रांची विद्यापीठाच्या मोरहाबादी कँपसमध्ये ही घटना घडली.

झारखंडमधील हजारीबाग येथील विनोबा भावे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रमेश शरण हे रांची विद्यापीठाच्या मोरहाबादी कँपसमधील अर्थशास्त्र विभागात वुमन्स स्टडी सेंटरच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. याची माहिती अभाविपच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी विभागाच्या गेटजवळ जमा होत कुलगुरुंच्या विरोधात निषेध आंदोलन सुरु केले. त्यानंतर बैठक ज्या खोलीमध्ये सुरु होती तिथे कुलगुरुंसह इतर प्राध्यापकांना काही काळ कोंडून ठेवण्यात आले. दरम्यान, या कार्यकर्त्यांनी विभागाबाहेर उभ्या असलेल्या कुलगुरुंच्या कारच्या बोनेटवर काळ्या शाईने ‘गो बॅक’, ‘आतंकवादी’ असे शब्द लिहिले. तर कारच्या नंबर प्लेटला काळे फासत त्यावर काळा झेंडाही लावला.

विद्यार्थी कार्यकर्त्यांचे आंदोलन तीव्र होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र विभागात घुसू नये यासाठी इतर शिक्षकांनी मुख्य दरवाजाला टाळे लावत तो बंद करुन घेतला. यावेळी रांची विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रमेश पांडे यांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले, त्यानंतर आंदोलकांना तिथून पांगवण्यात आले. जनसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे आहे हे कारण

जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० हटवण्याची घोषणा ज्या दिवशी संसदेत केंद्र सरकारकडून करण्यात आली त्यादिवशी विनोबा भावे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सुरु होता. कलम हटवल्याच्या घोषणेनंतर हा कार्यक्रम मध्येच थांबवण्यात आला होता. अभाविपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, कुलगुरुंनी केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला विरोध करण्यासाठीच हा कार्यक्रम मध्येच थांबवला होता. मात्र, विद्यापीठाने कार्यक्रम थांबवण्यामागे सुरक्षेचे कारण दिले होते. दरम्यान, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्याकडे कुलगुरु डॉ. रमेश शरण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.