पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाची दुसरी वर्षपूर्ती मोदी सरकार मोठ्या धामधुमीत साजरी करीत आहे. संपूर्ण देशात तीन दिवसांचा पराक्रम पर्व साजरा केला जात आहे. मात्र, राजकीय तज्ज्ञांनी सरकारच्या या भुमिकेचा संबंध आगामी सार्वत्रिक निवडणुकांशी जोडला आहे. यामुळेच लष्कराचे अनेक अधिकारीही सरकारच्या या निर्णयामुळे नाराज असल्याचे माध्यमांतील वृत्तांमधून सांगण्यात आले आहे.

लष्कारातील अनेक अधिकारी सर्जिकल स्ट्राइकवरुन वारंवार राजकारण केले जात असल्याने वैतागले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सैन्याकडून गुप्तपणे केलेल्या कारवायांचा अशा प्रकारे राजकीय फायद्यासाठी प्रचार होता कामा नये. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडीओ क्लीप लीक करण्यात आले. या मोहिमेतील काही सदस्य टीव्ही चॅनेलवर चर्चा करताना दिसून आले. भले त्यांचे चेहरे झाकलेले असले तरीही हे योग्य नाही. गुप्तपद्धतीने केलेल्या कारवाया गुप्तच ठेवण्यात यायला हव्यात. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षी कोणतेच पराक्रम पर्व साजरे करण्यात आले नाही. या वर्षी संरक्षण मंत्रालयाने अचानकपणे लष्कराला आदेश दिले की, त्यांनी ५१ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर याची द्विवर्ष पूर्ती साजरी करावी. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

२८ आणि २९ सप्टेंबर २०१६ रोजी मध्यरात्री भारतीय कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ४ लॉन्चपॅड सर्जिकल स्ट्राइकद्वारे उद्ध्वस्त केले होते. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मोठ्या प्रमाणावर ही मोहिम राबवण्यात आली होती. मात्र, यापूर्वीही युपीए सरकारच्या काळात सीमेवर अशा प्रकारचे छोटे-मोठे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. मात्र, एनडीए सरकारने त्यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला सार्वजनिक करुन टाकले.

२०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. विरोधकांनी सरकारवर आरोप केला होता की, सैन्याच्या पराक्रमाचा भाजपाकडून राजकीय फायद्यासाठी वापर केला जात आहे. तर भाजपाने विरोधकांवर हल्ला करताना विरोधकांनी सर्जिकल स्ट्राइकवर घेतलेली शंका ही सैन्याच्या प्रामाणिकतेवर आणि कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे.