03 June 2020

News Flash

छापे कर्नाटकात, गदारोळ दिल्लीत! संसदेत भाजप- काँग्रेसमध्ये जुंपली

छापेमारीचा राज्यसभा निवडणुकीशी संबंध नाही, सरकारचे स्पष्टीकरण

लोकशाहीची हत्या थांबवा, हुकूमशाही चालणार नाही अशा घोषणा काँग्रेस खासदारांनी दिल्या.

कर्नाटकमधील रिसोर्टवरील छापेमारीचे पडसाद बुधवारी दिल्लीत उमटले. छापेमारीमागे भाजपचा हात असून काँग्रेसच्या आमदारांना घाबरवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असा आरोप काँग्रेसने संसदेत केला. तर कर्नाटकचे उर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्या मालकीच्या रिसोर्टवरील छापेमारीचा राज्यसभा निवडणुकीशी संबंध नाही असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी संसदेत दिले.

राज्यसभा निवडणुकीत फुटीच्या भीतीने काँग्रेसने ४० हून अधिक आमदारांना कर्नाटकातील रिसॉर्टमध्ये लपवले आहे. त्या रिसॉर्टवर आयकर विभागाने बुधवारी सकाळी छापा टाकला. कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट आहे. या कारवाईचे पडसाद दिल्लीत संसदेत उमटले. काँग्रेसच्या आमदारांना घाबरवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली. राज्यसभेतील एका जागेसाठी भाजपने हा खटाटोप केला. पण भाजप त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होणार नाही असे खरगे यांनी सांगितले.

राज्यसभेतही काँग्रेस खासदार आक्रमक झाले होते. उपसभापती पीजे कुरियन यांच्या आसनासमोर येऊन खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाहीची हत्या थांबवा, हुकूमशाही चालणार नाही अशा घोषणा काँग्रेस खासदारांनी दिल्या. सरकारी यंत्रणेचा वापर विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यासाठी केला जात आहे. सीबीआय, आयकर आणि ईडीसारख्या यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी सुरु असल्याचे आनंद शर्मा यांनी सांगितले. आयकर विभागाच्या छाप्यांची वेळ आणि स्थान यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ही कारवाई म्हणजे पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. एक व्यक्ती जो काँग्रेससाठी काम करत आहे त्याच्यावरच ही कारवाई करण्यात आली याकडे त्यांनी लक्ष वेधले. सत्ताधारी भाजपला संसदेत विरोधी पक्षच नको असल्याचे आनंद शर्मा यांनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांना सांगितले.

निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात झाली पाहिजे. पण या तिन्ही गोष्टींचे पालन होत नाही. पश्चिमेत जे दहशतीचे वातावरण होते, ते आता दक्षिणेत पोहोचले आहे असा आरोप काँग्रेस खासदार गुलाम नवी आझाद यांनी मोदींचे नाव न घेता केला. ही कारवाई एका पक्षावर नव्हे तर व्यक्तीवर झाल्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा असल्याचा दावाही  त्यांनी केला.

विरोधकांच्या टीकेनंतर केंद्रीय अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी लोकसभा आणि राज्यसभेत सरकारची बाजू मांडली. कर्नाटकमधील छापेमारीचा राज्यसभा निवडणुकीशी संबंध नाही असे जेटलींनी सांगितले. रिसोर्टमध्ये एकाही आमदाराची चौकशी झाली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आयकर विभागाने ३९ ठिकाणी छापे टाकले. एखादा व्यक्ती काँग्रेस आमदारांच्या आदरातिथ्य करत आहे म्हणून त्याला घरात अवैध संपत्ती ठेवण्याचा परवाना मिळत नाही असे त्यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 4:40 pm

Web Title: parliament monsoon session 2017 bjp congress arun jaitely karnataka it raids on resort gujarat anand sharma
टॅग Bjp,Congress,Parliament
Next Stories
1 डोक्लाममधून बिनशर्त सैन्य हटवा; चीनचा भारताला पुन्हा इशारा
2 रक्षाबंधनाबद्दलचा ‘तो’ वादग्रस्त आदेश अखेर प्रशासनाकडून रद्द
3 गोव्यातील बीचवर दारू पिणाऱ्यांना तुरूंगात टाकणार
Just Now!
X