संरक्षण खात्याची कार्यालय संकुले ही सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा भाग असल्याचे सांगितले असते तर टीकाकारांचा ‘खोटारडेपणा’ व ‘चुकीची माहिती’ उघड झाली असती. त्यामुळे त्यांनी सोयिस्कररीत्या याबाबत मौन बाळगले असे सांगून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी या प्रकल्पाच्या विरोधकांवर जोरदार टीका केली.

संरक्षण मंत्रालय आणि सशस्त्र दले यांच्या ७ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी कस्तुरबा गांधी मार्ग व आफ्रिका अ‍ॅव्हेन्यू येथील दोन बहुमजली आलिशान कार्यालय संकुलाचे उद्घाटन मोदी यांनी केले. याप्रसंगी ते बोलत होते. संसदेच्या नव्या इमारतीचे काम वेळेवर पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सेंट्रल विस्टाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा संसाधनांचा ‘गुन्हेगारी अपव्यय’ असल्याचे सांगून काँग्रेससह इतर विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहेत. या प्रकल्पावर खर्च होणारा पैसा करोना महासाथीच्या उपचारांसाठी वळवण्याचे आवाहनही त्यांनी सरकारला केले आहे.

आज देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात आपण देशाच्या राजधानीचा नव्या भारताच्या गरजा व आकांक्षांनुसार विकास करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलत आहोत. या नव्या संरक्षण कार्यालय संकुलांमुळे आपल्या संरक्षण दलांचे कार्य अधिक सोयिस्कर व परिणामकारक करण्याचे आपले प्रयत्न आणखी बळकट होणार आहेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.