नवीन पासपोर्ट काढण्यासाठी करावा लागणारा द्रविडी प्राणायाम सर्वांनाच ठाऊक आहे. पण आता हा सगळा ‘ताप’ कमी होणार असून पासपोर्ट अवघ्या तीन दिवसांत मिळणार आहे. पोलीस व्हेरीफिकेशनसाठी नवीन मोबाईल अॅप आणला आहे. या अॅपमुळे व्हेरीफिकेशनसाठी होणारा विलंब टाळता येणार आहे. पोलीस व्हेरीफिकेशन ऑनलाईन होणार असल्याने अवघ्या तीन दिवसांत पासपोर्ट मिळणार आहे.

पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात आता पोलिसांनी सुरू केलेल्या या मोबाईल अॅपमुळे पोलीस व्हेरीफिकेशनच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे. पासपोर्टची सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे आधीच या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या वेळेत बचत झाली आहे. पासपोर्ट कार्यालये आणि पोलीस ठाण्यांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. आता पोलीस व्हेरीफिकेशनही ऑनलाईन झाल्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुकर आणि वेगाने पूर्ण होणार आहे. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर पोलीस व्हेरीफिकेशनसाठी या मोबाईल अॅपचा आधार घेतला जाणार आहे. या अॅपवरूनच तुमची संपूर्ण माहिती घेण्यात येईल. त्यानंतर तुमच्या अर्जानुसार व्हेरीफिकेशनसाठी पोलीस तुमच्या घरी येतील. त्यानंतर आपल्यावर गुन्हेगारी खटले नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. तसेच आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्डच्या प्रतीसह अर्ज सादर केल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाकडून प्राधान्याने तुमचा पासपोर्ट जारी करण्यात येईल.