भारत-चीन सीमावादात अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. व्हाइट हाऊसने काल या मुद्यावर अत्यंत कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली. पूर्व लडाखच्या सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी अमेरिकेने चीनच्या आक्रमकतेला जबाबदार धरले आहे.

“भारत-चीन सीमेवर चीनची आक्रमक भूमिका ही जगातील अन्य भागातील चीनच्या आक्रमकतेच्या पॅटर्नशी सुसंगत आहे. अशा कृतीमधून चिनी कम्युनिस्ट पार्टीचे खरा स्वभाव दिसून येतो” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत-चीन सीमावादाच्या विषयावर व्हाइट हाऊसची आतापर्यंत थोडी सौम्य भूमिका होती. पण प्रथमच इतक्या कठोर शब्दात चीनला फटकारल्याचे वॉशिंग्टनमधील भारत-अमेरिका संबंधांच्या अभ्यासकांनी सांगितले.

१५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर पूर्व लडाखमधल्या परिस्थितीवर अमेरिकेचे अत्यंत बारीक लक्ष आहे. “भारत आणि चीन दोघांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीत शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याला आमचा पाठिंबा आहे” असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवाने म्हटले आहे.

भारताच्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीला अमेरिकेचं समर्थन
भारतानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीला अमेरिकेनंही समर्थन दिलं आहे. या बंदीमुळे भारताचं सार्वभौमत्व आणि सुरक्षेला चालना मिळणार असल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं. “चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या अ‍ॅपवर भारतानं घातलेल्या बंदीचं आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचं रक्षण होईल,” असं त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं.