Paytm हे अ‍ॅप पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल असं पेटीएमने म्हटलं आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम अ‍ॅप  गुगलने त्यांच्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकलं होतं. पेटीएमच्या माध्यमातून खेळासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी संमती देत नाही असं गुगलने स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता हे App पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

गुगलने यासंदर्भात आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. लाखो युझर्स असणाऱ्या पेटीएमवर कारवाई करण्यामागे कंपनीने ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे कारण दिलं आहे. “आम्ही ऑनलाइन कॅसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशा प्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान आता हे अॅप पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे अशी माहिती पेटीएमनेच दिली आहे.