काश्मिरमधल्या लोकांबरोबरच पाकिस्तानशी चर्चा करण्याची आमची भूमिका असल्याचं पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं. भाजपानं पाठिंबा काढल्यानंतर मुफ्ती यांनी राजीनामा दिला असून जम्मू व काश्मीरमध्ये राजकीय भूकंप झाला आहे.

पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवावेत असं आमचं मत होतं, त्याचप्रमाणे राज्यात दडपशाहीचं राज्य चालू शकणार नाही, इथं गोडीगुलाबीनंच काम होऊ शकतं असं मुफ्ती म्हणाल्या. तरूणांवरचे गुन्हे मागे घेणं, विकासाची कामं करणं, शांतता राखणं तसंच चर्चा करून कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा आमचा अजेंडा होता असं मुफ्ती म्हणाल्या. मी आता माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे असेही मुफ्ती यांनी स्पष्ट केले.

जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपाची युती तुटली याचे मला काही आश्चर्य वाटले नाही असे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. दोन्ही पक्ष एका हेतूने एकत्र आले होते, पॉवर पॉलिटिक्स करणे हा आमचा उद्देश नव्हता. काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर पाकिस्तानसोबत चर्चा झाली पाहिजे, चर्चेने प्रश्न सुटतात हे पीडीपीचे धोरण आहे. जम्मू काश्मीर हे असे राज्य आहे जिथे तुम्ही कोणतेही धोरण जनतेवर लादू शकत नाही. पीडीपी आणि भाजपाने जम्मू-काश्मीरच्या विकासाचा उद्देश समोर ठेवूनच सरकार स्थापले होते. काश्मीर खोऱ्यातील लोकांशी आणि पाकिस्तानशी संवाद झाला तर कदाचित हा प्रश्न निकाली लागू शकतो असेही मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. जम्मू काश्मीरचे लोक रोजचे आयुष्य जगतानाही अनंत अडचणींचा सामना करत आहेत त्या अडचणींमधून त्यांना बाहेर काढणे हाच आमचा सत्ता स्थापनेमागचा उद्देश होता असेही त्यांनी स्पष्ट केले.