भारत आणि पाकिस्तानातली शांतता प्रक्रिया स्थगित झाली आहे, अशी घोषणा करीत पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारतीय पथकाला पाकिस्तानात येऊ देण्यास पाकिस्तानने गुरुवारी नकार दिला. यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांत तणाव निर्माण झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश धोरणालाही हादरा बसला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरातील लग्नसोहळ्याच्या निमित्ताने मोदी यांनी पाकिस्तानचा अनियोजित दौरा करून राजकीय मुत्सद्दी प्रथांनाही बगल दिली होती. त्या दौऱ्यानंतर पठाणकोटच्या हवाई तळावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध केला आणि हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने नुकतीच पठाणकोटला भेट दिली होती. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथकही पाकिस्तानला जाईल, असे केंद्र सरकारकडून सांगितले जात होते.
भारताची ही मागणी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी गुरुवारी परदेशी पत्रकारांच्या बैठकीत सरळ धुडकावली. आमचे पथक आले म्हणजे त्यांचेही यायला हवे, असा हा काही आदानप्रदान कार्यक्रम नाही. हल्ल्याच्या मुळाशी जाणे, हा आमच्या पथकाच्या दौऱ्याचा हेतू होता. उभय देश एकमेकांना दहशतवादी हल्ल्याच्या तपासात सहकार्य करीत आहेत, हे आमच्या दौऱ्याने स्पष्ट झाले. प्रत्यक्षात भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण यादव यांना हेरगिरीवरून झालेल्या अटकेमुळे आमच्या देशात विशेषत: बलूचिस्तानातील फुटीर चळवळींना भारत खतपाणी घालत असल्याचेच स्पष्ट होते, असा आरोपही बसित यांनी केला. जैश ए महम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला अतिरेकी घोषित करण्याचा भारताचा प्रयत्न चीनच्या नकाराधिकारामुळे फोल ठरला. त्याबाबत छेडता बसित यांनी चीनच्या भूमिकेचे समर्थन केले.
पठाणकोट हल्ल्यानंतर उभय देशांत परराष्ट्र मंत्रालय पातळीवर होणारी बैठक भारताने रद्द केली होती. त्याबाबत बसित म्हणाले की, नजिकच्या भविष्यात अशी बैठक होण्याची शक्यता नाही. अर्थात संवादाच्या मार्गावरच आमचा विश्वास आहे. चर्चेतूनच सर्व प्रश्न सुटतात, यावर आमचा विश्वास आहे. भारत त्या संवादासाठी कधी राजी होतो, याची आम्ही वाट पाहात आहोत, असेही बसित म्हणाले.
अर्थात ही चर्चा दोन्ही देशांच्या सार्वभौमत्वाची बूज राखणारी असली पाहिजे, हे सांगतानाच काश्मीरचा मुद्दा हाच चर्चेतला कळीचा मुद्दा असल्याचेही त्यांनी नमूद केले. काश्मिरातील जनतेच्या इच्छांनुसारच हा प्रश्न सोडविण्याचा आमचा आग्रह आहे, असे बसित म्हणाले.