“भगवान रामाच्या नावाची काही लोकांना अॅलर्जी आहे. मात्र, त्यांनी इंडोनेशियाकडून शिकायला हवे, कारण येथे आपल्या देव-देवतांच्या परंपरांचा आदर राखला जातो” असे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. आदित्यनाथ शुक्रवारी विधानपरिषदेत बजेट संदर्भातील चर्चेदरम्यान बोलत होते.
आदित्यनाथ म्हणाले, आयोद्ध्या ही रामजन्मभूमी असल्याची आमची ठाम धारणा आहे, त्यामुळे इथल्या विकासकामांना आम्ही सुरुवात केली असून आमच्या सरकराने येथील घाटांचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. आम्ही याठीकाणी आता रामाचे संग्रहालय उभारणार आहोत. त्याचबरोबर आम्ही आयोद्धेला सीतामढीशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चारपदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याला ‘रामायण सर्किट’ असे नाव देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात सध्या ‘समाजवादा’ची गरज नसून ‘राष्ट्रवादाची’ गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘समरसता’ हे राष्ट्रवादाचेच स्वरूप असल्याची भुमिका त्यांना मांडली. आमचे सरकार हे धर्म आणि जातीतील भेदभाव बाजूला सारून विकासावर काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आदित्यनाथ पुढे म्हणाले, काही लोकांना रामाच्या नावाची अॅलर्जी आहे. मात्र, मृत्यूनंतर ‘राम नाम सत्य’ असा जप केला जातो. मात्र तरीही हे म्हणतात की, तुम्ही सारखे आयोद्धेच्या नावाचा जप का करता. यासाठी तुम्ही मुस्लिम राष्ट्र ‘इंडोनेशियात’ जाऊन पहा, तेथिल लोकांना रामाबाबतच्या आपल्या परंपरांचा अभिमान आहे. ज्यांना रामाच्या नावाची अॅलर्जी आहे, त्यांनी यांच्याकडून काही शिकायला हवे. समाजवादीवाले म्हणतात की, आम्ही राम मनोहर लोहीया यांच्या विचारसरणीला मानतो. पण त्यांचेही नाव रामच आहे. मात्र, तरीही त्यांना रामाच्या नावाचा अभिमान वाटण्याऐवजी लाज वाटते.
आदित्यनाथ यांच्या भाषणावेळी विरोधीपक्षांपैकी समाजवादी, कॉंग्रेस आणि बसपाचे कोणीही आमदार यावेळी सभागृहात हजर नव्हते. यांच्या अनुपस्थितीतच निधीच्या विनियोगासंबंधीची आणि इतर विधेयके मंजूर करण्यात आली.