03 March 2021

News Flash

Bihar Result: पहिल्यांदाच नितीश कुमार मीडियासमोर; मुख्यमंत्रीपदासंबंधी केलं मोठं वक्तव्य

निकालावर आत्मपरीक्षण केलं जात असल्याची दिली माहिती

संग्रहित छायाचित्र

बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. नितीश कुमार यांनी जेडीयूच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितीश कुमार यांनी जनतेने एनडीएला बहुमत दिलं असून सरकार स्थापन केलं जाईल अशी माहिती दिली. नितीश कुमार यांनी यावेळी आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नसून एनडीए निर्णय घेईल असं म्हटलं आहे. तसंच शपथग्रहणाची तारीख अद्याप ठरलेली नसल्याचंही सांगितलं.

नितीश कुमार यांनी म्हटलं आहे की, “शपथग्रहण दिवाळीनंतर की छठनंतर करायचा याबद्दल अद्याप ठरलेलं नाही. उद्या एनडीएची बैठक होणार असून तिथे निर्णय घेतला जाईल. जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं आहे. एनडीए सरकार स्थापन करणार”. जेडीयूच्या जागा कमी होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता नितीश कुमार यांनी जो निकाल आला आहे त्याचं विश्लेषण करण्यात आलं. आमच्या जागांवर काय परिणाम झाला याबाबत अध्ययन केलं जात असल्याची माहिती दिली.

नितीश कुमार यांना मुख्यमंत्री कोण होणार? असं विचारण्यात आलं असता, “आपण मुख्यमंत्रीपदावर दावा केलेला नाही, एनडीए निर्णय घेईल” असं सांगितलं.

एनडीएने १२२ जागांसहित बहुमत मिळवलं आहे. भाजपाला ७४ जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाला जिथे २०१५ मध्ये ७१ जागा मिळाल्या होत्या तिथे यावेळी ४३ जागांवरच विजय मिळवता आला. भाजपाच्या जागा मात्र ५३ वरुन ७४ वर पोहोचल्या. यासोबत भाजपा बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे.


दरम्यान याआधी तेजस्वी यादव यांनी मात्र महागठबंधन सरकार स्थापन होईल असं सांगत आमदारांना तयार राहण्याचा आदेश दिला आहे. यामुळे बिहारमध्ये पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळण्याची शक्यता आहे. निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी नवनियुक्त आमदारांसोबत बैठक घेत सर्वांचे अभिनंदन केले. तसंच पत्रकार परिषदही घेतली.

पक्ष बैठकीत बोलताना तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करणार असल्याचं म्हटलं आहे. तेजस्वी यादव यांनी यावेळी आरजेडीच्या सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघात न परतता पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याचा आदेश दिला आहे. विकासशील इन्सान पार्टी आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाचा एनडीएमध्ये कशा पद्धतीने समावेश होते हे पाहून पुढील रणनीती ठरवली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.

तेजस्वी यादव यांनी यावेळी नितीश कुमार यांच्यावर टीका करत तुमच्याकडे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर कट रचणं सोडून द्या असा टोला लगावला. “त्यांनी लोकांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे आणि आपल्या पदावरुन मागे हटलं पाहिजे. याआधी त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याबद्दल सांगितलं होतं. राजकारणातील आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी असं काही अनादर वाटणारं काम करु नये,” असा सल्ला तेजस्वी यादव यांनी दिला आहे.

तेजस्वी यादव यांनी यावेळी निवडणूक आयोगावरही नाराजी व्यक्त केली. “जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने होता, पण निवडणूक आयोगाचा निर्णय एनडीएच्या बाजूने होता. पण हे पहिल्यांदा झालेलं नाही. २०१५ मध्येही जेव्हा महागठबंधन झालं होतं तेव्हाही निकाल आमच्या बाजूने होता, पण भाजपाने मागच्या दरवाजाने प्रवेश केला” अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. तेजस्वी यादव यांनी मतमोजणी प्रक्रियेत असणाऱ्या पळवाटा सांगितल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 7:02 pm

Web Title: people have given the mandate to nda and it will form government says nitish kumar sgy 87
Next Stories
1 सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामराविरोधात खटला दाखल होणार
2 बिहारमध्ये राजकीय उलथापालथ? तेजस्वी यादव महागठबंधनचं सरकार स्थापन करण्याच्या तयारीत
3 अभिनेते आसिफ बसरा यांची आत्महत्या
Just Now!
X