राजस्थानमध्ये एक अतिशय धक्कायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अपघात झाल्यानंतर आपण मदत करायला धावतो. मात्र याठिकाणी अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त मदत मागत असतानाही उपस्थित असणारे सेल्फी आणि व्हिडियो काढत होते. त्यामुळे तांत्रिक उपकरणांच्या आहारी गेलेल्या निर्दयपणाचे दर्शनच याठिकाणी घडले. शाळेची बस आणि दुचाकीस्वार यांची धडक होऊन अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी तीन जण जखमी झाले. हा अपघात घडत असताना आणि झाल्यानंतरही येथे अनेक जण उपस्थित होते. पण मदतीला न येता हे लोक अपघातग्रस्तांबरोबर सेल्फी काढण्यात व्यग्र होते. वेळीच मृत पावलेल्या दोन जणांना मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.

बाडमेर चौहटन या भागात हा अपघात झाल्यानंतर जखमी झालेला एक तरुण मदतीची याचना करत होता. पण त्याला मदत करायची सोडून लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्यात आणि घटनेचे व्हिडियो शूटींग करण्यात धन्यता मानत होते. मुख्य म्हणजे वेळीच मदत न मिळाल्याने या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. अपघातातील व्यक्तींना सुप्रिम कोर्टाने सुरक्षेची हमी दिली आहे. मात्र तरीही लोक अशावेळी मदतीसाठी पुढे येत नसल्याच्या घटना वारंवार समोर येताना दिसतात. फोटो आणि व्हिडियो काढण्याचे इतके वेड की लोक आपल्यातील माणुसकी हरवून बसतील ही अतिशय चिंतेची बाब आहे. एएनआयनी याबाबतचे वृत्त दिल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी या घटनेबाबत राग आणि खेद व्यक्त केला आहे.