११ जून २०१८ रोजी म्हणजे आजच्याच दिवशी पेरारिवलनला तुरूंगात २७ वर्ष पूर्ण झाली. ११ जून १९९१ रोजी वयाच्या १९ व्या वर्षी त्याला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. किंबहुना त्याला अटकही करण्यात आली नव्हती तर त्याच्या आई-वडिलांनीच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. त्यांच्या मुलाला दुसऱ्या दिवशी चौकशी करुन पोलीस सोडून देतील ही अपेक्षा त्याच्या आई-वडिलांची होती. पण आज या घटनेला २७ वर्ष झाली तरीही त्याचे आई-वडील तो दुसरा दिवस कधी उजाडेल याचीच वाट पाहत आहेत. आज पेरारिवलन यांना अरिवू या नावानेही ओळखलं जातं.

सीबीआयने पेरारिवलन यांना दुसऱ्या दिवशी सोडलं नाही, किंवा त्याच्या आईला भेटण्याचीही रवानगी दिली नाही. त्यानंतर पुढील ५९ दिवस तो कुठे होता याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. माजी पंतप्रधानांच्या हत्येप्रकरणी आपल्या मुलाला अटक झाल्याचं वृत्त जगजाहिर होईल या भितीने कैद्याला न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याची मागणीही त्याच्या आई-वडिलांना करता आली नाही. पण त्यांचा न्यायदेवतेवर विश्वास होता आणि आपला मुलगा निर्दोष आहे त्यामुळे त्याची लवकरच सुटका होईल ही त्यांची अपेक्षा होती. निर्दोष व्यक्तीला शिक्षा होणार नाही असं त्याच्या पालकांना त्यावेळीही वाटायचं, आणि आता २७ वर्षांनंतरही त्यांना तिच अपेक्षा आहे. न्यायासाठी त्यांनी शक्य ते सर्व दरवाजे ठोठावले आणि अजूनही त्यांनी अपेक्षा सोडलेली नाही.

पण त्यांच्या या अपेक्षांना केवळ एकदा नाही तर जेव्हा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला त्या प्रत्येक वेळेस तडा गेला कारण त्यांच्या पदरी दरवेळेस निराशाच आली. पण प्रत्येक वेळेस त्यांनी त्यांच्याकडे असलेली सत्याची ताकद पणाला लावून पुन्हा लढा देण्याचा प्रयत्न केला. सत्य हेच की अरिवूचा आणि राजीव गांधींच्या हत्येचा काहीही संबंध नाही.

राजीव गांधींच्या हत्येसाठी ज्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला त्यासाठी लागणरी ९ व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ९ व्होल्टची ती बॅटरी जी कोणत्याही इलेक्ट्रिक दुकानात अगदी सहज उपलब्ध असते. त्याच्यावरील आरोपाला पुरावा हा की ज्या दुकानातून अरिवूने बॅटरी विकत घेतली त्याने अरिवूला ओळखलं. आश्चर्य म्हणजे घटनेच्या अनेक महिन्यांनंतरही दुकानदाराला अरिवून काय विकत घेतलं हे लक्षात होतं. त्याहून मोठं आश्चर्य म्हणजे सीबीआयला अरिवूच्या खिशामध्ये बॅटरी विकत घेतल्याची पावतीही सापडली. आणि दुसरा पुरावा म्हणजे स्वतः अरिवूने दिलेला कबुलीजबाब. खरंतर, पोलिसांकडे दिलेला कबुलीजबाब हा पुरावा म्हणून भारतीय दंड विधानाप्रमाणे मानण्यात येत नाही. मात्र, अरिवूवर लावलेले आरोप हे टाडा कायद्यानुसार लावण्यात आले आहेत. आणि या नियमांना टाडा हा अपवाद आहे.

टाडा या कायद्यातल्या तरतुदीनुसार पोलिस अधिकाऱ्याकडे दिलेला जबाब ग्राह्य मानला जातो. नेमका यावरच अनेकांचा आक्षेप आहे. अरिवूकडून थर्ड डिग्री व शारीरिक छळ करून हा कबुलीजबाब मिळवलेला असू शकतो आणि केवळ असा कबुलीजबाब टाडा कायद्यात ग्राह्य ठरत असल्यामुळे तो अडचणीत असू शकतो. त्याचा कबुलीजबाबही पूर्णपणे सादर करण्यात आला नसल्याचा आक्षेप एका सीबीआय अधिकाऱ्यानं घेतला आहे. त्यागराजन या माजी सीबीआय अधिकाऱ्यानं सांगितलं की, ती बॅटरी कशासाठी वापरण्यात येणार आहे याची आपल्याला कल्पना नव्हती असंही अरिवूनं कबुलीजबाबात म्हटलं होतं. परंतु हा भाग तेवढा सोयीनं काढण्यात आला. कारण, त्याचा कबुलीजबाब ग्राह्य धरूनही त्याचा कटात सहभाग असल्याचे सिद्ध होत नव्हते. मात्र, हा भाग काढल्यामुळे तो अडकल्याचे त्यागराजन यांनी म्हटलं आहे.

एक मात्र खरं की त्याच्या घरच्यांना तो निर्दोष असल्याची खात्री आहे, कारण 9 व्होल्टच्या बॅटरीची पावती सोडली तर त्याच्याविरोधात काही पुरावा नाहीये असं त्यांचं मानणं आहे. त्यागराजन यांनी असंही म्हटलं आहे की, अरिवूची 27 वर्ष तर फुकट गेली आहेतच, आशा आहे की किमान उर्वरीत आयुष्य तरी त्याला तुरूंगाबाहेर कुटुंबियासमवेत व्यतित करता येईल.

वयाची सत्तरी गाठलेल्या त्याच्या आईला आपला मुलगा निर्दोष सुटेल अशी आशा आहे. लोकशाही आणि न्यायदेवतेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकासाठी ही परीक्षा आहे. न्यायाला आधीच उशीर झाला आहे पण किमान उर्वरीत आयुष्य तरी मुलासोबत घालवता येईल अशी आईची अपेक्षा आहे.

मात्र, यावर्षी मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलनच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. पेरारिवलकडून प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.