पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ लशीच्या मात्रा परदेशात पाठविल्या आणि भारतातील साठा रिक्त झाल्यावर लशीची खुल्या बाजारपेठेत विक्री करण्याची परवानगी दिली, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी येथे केला.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या लशीच्या मात्रा मिळविण्यासाठी महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही राज्ये संघर्ष करीत असताना नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिमा उंचावण्यासाठी लशींची अन्य देशांना निर्यात केली, असेही ममता बॅनर्जी यांनी येथे एका सभेत सांगितले.

लस खुल्या बाजारपेठेत मिळेल असे मोदी यांनी सोमवारी जाहीर केले, परंतु खुली बाजारपेठ कोठे आहे, लशीची उपलब्धता आहे का, तुम्ही अगोदरच मोठ्या प्रमाणावर लशींच्या मात्रा अन्य देशांमध्ये पाठविल्या आहेत, असा आरोप ममतांनी केला. केंद्र सरकारने शेजारी देशासह अनेक देशांना लस भेट म्हणून दिली आणि ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यासह अनेक देशांमध्ये निर्यात करण्याची मुभा दिली.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार अकार्यक्षमतेचे स्मारक असल्याचे नमूद करून ममता म्हणाल्या की, सदोष नियोजनामुळे आपल्याला लशींचा मोठा तुटवडा भासत आहे. कोलकाता, असनसोल, उत्तर २४ परगणा येथे करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे आणि राज्य सरकार मर्यादित साठ्यासह करोनाचा मुकाबला करण्यासाठी झगडत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून केंद्रीय नेतृत्वाने योजना आखली नाही, नेते पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या योजना आखण्यात मश्गूल होते, असा आरोपही ममतांनी केला.