फायझर कंपनीने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लशीच्या क्लिनिकल ट्रायल डाटाचे अंतिम विश्लेषण केले आहे. या विश्लेषणानुसार, ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा फायझरने केला आहे. ही लस सर्व वयोगटातील लोकांचे संरक्षण करते. आतापर्यंत ४४ हजार लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली, असे फायझर आणि त्यांची भागीदार कंपनी बायोनटेक एसईने म्हटले आहे. या रिझल्टमुळे सर्वसामान्यांना लवकरात लवकर लस उपलब्ध करुन देण्यासाठी, परवाना मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे.

लशीचा पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी आणि दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांनी शरीरात करोनापासून बचाव करणाऱ्या घटकांची निर्मिती झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. करोनावर इतक्या मोठया प्रमाणात परिणामकारक ठरणारी लस उपलब्ध होणार ही चांगली बाब आहे. पण या लशीचे स्टोअरेज करणे हे एक मोठे आव्हान आहे. फायझरने बनवलेली लस नव्या टेक्नोलॉजीने विकसित केली आहे. व्हायरस विरोधात रोगप्रतिकारक शक्तीला सक्रीय करण्यासाठी सिंथेटीक एमआरएनएचा वापर केला जातो.

मायनस ७० डिग्री सेल्सिअस अंटार्क्टिकात हिवाळ्यात जे तापमान असते, त्या तापमानात लस स्टोअर करावी लागणार आहे. फायझरच्या लशीबाबत हेच एक मोठे आव्हान आहे. ही लस मायनस ७० डिग्री तापमानात स्टोअर करणे हे भारतासारख्या विकसनशील देशासाठी एक मोठे आव्हान असेल, असे एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरीया म्हणाले होते.

फायझर प्रमाणे मॉडर्ना कंपनीची लसही ९५ टक्के प्रभावी ठरल्याने आता करोना प्रतिबंधाच्या उपायांत एक पाऊल पुढे पडले आहे. फायझर-बायोएनटेक तसेच मॉडर्ना या दोन्ही कंपन्यांनी अत्यंत अभिनव जैवतंत्रज्ञानाचा वापर करून या लशी तयार केल्या आहेत. त्यात संदेशवाहक आरएनए रेणू (मेसेंजर आरएनए- रायबोन्युक्लिइक अ‍ॅसिड) वापरण्यात आला आहे.