‘रेडिट’च्या चर्चासत्रात वैज्ञानिक मिशियो काकू यांचा दावा

पुढील शतकात पहिल्यांदा मानव परग्रहवासीयांच्या आमनेसामने येईल, असा दावा सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ मिशियो काकू यांनी रेडिटच्या गेल्या आठवडय़ातील चर्चासत्रात केला आहे.

माणूस व परग्रहवासीय यांची ही भेट कशा प्रकारे व कुठे होईल या बाबत त्यांनी काही सांगितले नाही. परग्रहावरील लोकांशी आपला संपर्क होऊ  शकेल का असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले, की परग्रहवासीयांबरोबर आमनेसामने भेट होईल, पण ती कशा स्वरूपाची व कुठे होईल हे सांगता येत नाही. ती भेट मैत्रिपूर्ण असेल की त्यात काही दगाफटका होईल हेही निश्चित सांगता येणार नाही असे ते म्हणाले. काकू हे न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीत भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असून एका शतकाच्या काळात परग्रहवासीयांशी संपर्क होऊन त्यांच्याशी गाठभेट होईल या मताशी ते चिकटून आहेत.

रेडिओ लहरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परग्रहवासीयांचे संभाषण टिपणे शक्य होणार आहे. त्यामुळे ते कुठे आहेत हे समजले, पण ते काय बोलतात त्याचा अर्थ मात्र आपल्याला समजणार नाही असे काकू म्हणाले.

परग्रहवासीय हे हजारो प्रकाशवर्षे दूर असतील, त्यामुळे त्यांच्याशी आपण बोलू शकणार नाही, पण काही काळात आपण त्यांच्या भाषेचा उलगडा करू शकतो. त्यांच्या तंत्रज्ञानाची पातळीही आपल्या आवाक्यात येईल. जर माणूस परग्रहवासीयांच्या आमनेसामने आला तर त्यात दोन शक्यता आहेत, एक म्हणजे परग्रहवासीय आक्रमक असू शकतात, विस्तारवादी असू शकतात किंवा ते शांत असू शकतात, त्यामुळे ते केवळ त्यांचे अस्तित्व जाहीर करतील. पण ते माणसाला शांतपणे सामोरे जाणार नाहीत, कारण माणूस हा त्यांच्यासाठी जंगली प्राण्याप्रमाणेच असणार आहे व ते आपल्याशी संपर्क साधू शकणार नाहीत. आपली भाषाही त्यांना समजणार नाही, त्यामुळे  संघर्ष होऊ  शकतो.

परग्रहावरील जीवसृष्टीची शक्यता व त्याचा शोध ही कुतूहलाची बाब असून यूएफओचा अभ्यास करून ते परग्रहवासीयांनीच पाठवलेले असतात असा दावा केला जातो. हे दावे अनेकदा खोटेही ठरलेले

आहेत. यूएफओ म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्सच्या समर्थकांच्या मते परग्रहवासीयांचे अस्तित्व लपवण्यासाठी नासा त्यांचे दावे खोटे ठरवत आहे. परग्रहवासीयांशी भेटीचा प्राणिसंग्रहालय सिद्धान्त पुढे आला असून, त्यानुसार माणसे ही परग्रहवासीयांच्या मते प्राणिसंग्रहालयात कोंडलेले प्राणी असतील व प्राणिसंग्रहालयाचा रक्षक जसा दुरून त्यांच्याशी व्यवहार करतो तसे परग्रहवासीय कुठलाही हस्तक्षेप माणसाच्या व्यवहारात करणार नाहीत. ते केवळ त्याची उत्क्रांती बघत राहतील.