देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी टि्वटरवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोवरुन रविवारी युझर्सनी पियूष गोयल यांना मोठया प्रमाणात ट्रोल केले. गोयल यांनी रात्रीच्यावेळी उपग्रहाच्या माध्यमातून घेण्यात आलेले भारताचे दोन फोटो टि्वटरवर पोस्ट केले होते. सर्व भागात वीज पोहोचल्यानंतर भारत आता कसा दिसतो व आधी कसा दिसायचा हे सांगणारे ते दोन फोटो होते. या फोटोंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ठरवलेल्या मुदतीआधीच भारताने सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य गाठले. भारतीयांच्या जीवनातून अंधकार दूर करुन नवीन, शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा संदेश त्यांनी फोटोखाली लिहीला होता.

पियूष गोयल यांच्या टि्वटनंतर काहीवेळातच टि्वटर युझर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण गोयल यांनी जे फोटो टि्वट केले होते ते दोन वर्ष जुने फोटो होते. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून रात्रीच्यावेळी भारत कसा दिसतो त्याचे फोटो काढले होते. पहिला फोटो २०१२ सालचा होता. दुसरा फोटो नासाने मागच्यावर्षी प्रसिद्ध केला पण तो २०१६ सालचा होता.

देशातील सर्व भागात वीज पोहोचवल्याचा दावा करतानाच जुन फोटो पोस्ट करुन फसवणूक केली म्हणून युझर्सनी गोयल यांनी खूप टोले लगावले. दरवर्षी दिवाळीनंतर हा फोटो पोस्ट केला जातो. भारतीय जनता पार्टी मोठया प्रमाणावर फेक न्जूय आणि फोटो शॉपवर अवलंबून आहे असे एका युझरने म्हटले होते. एका युझरने अभिनंदन करताना तुमच्या सोशल मीडिया टीमला फोटोचा स्त्रोत आणि तारीख दोनदा तपासून घ्यायला सांगा असा सल्ला दिला होता.