पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रमोद कुमार मिश्रा यांना पदोन्नती देत प्रधान सचिव पदी नियुक्त केले आहे. तर माजी केंद्रीय सचिव पी.के. सिन्हा यांची पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पदावर नियुक्ती केली आहे. या दोन्ही नियुक्त्यांकडे पीएमओतील मोठे बदल म्हणून बघितले जात असून, बुधवारी हे आदेश काढण्यात आले.

पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी राजीनामा दिल्यानंतर हे दोन बदल करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नृपेंद्र मिश्रा यांची नियुक्ती केली होती. दरम्यान, नवे प्रधान सचिव असलेले पी.के. मिश्रा हे मागील पाच वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयातच सह प्रधान सचिव पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे गेल्या दोन दशकांपासून मोदी आणि मिश्रा एकमेकांना चांगल्या परिचयाचे आहेत. नरेंद्र मोदी यांनी २००१मध्ये पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पी.के. मिश्रा हे मुख्यमंत्री कार्यालयात वरिष्ठ पदावर काम करत होते. यावेळी दोघांना काही वर्षे सोबत काम केलेले आहे.

मिश्रा हे १९७२ बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून पदवी घेतली आहे. आर्थिक विकास या विषयात स्पेशलायझेश केले आहे. तसेच या विषयात त्यांनी संशोधन करून पीएच.डी पदवी घेतली आहे. कृषि, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा, पायाभूत क्षेत्रातील कर्जपुरवठा आणि व्यवस्थापन आदी विषयाचे ते जाणकार आहेत.