चीन एकाबाजूला चर्चा करत असला तरी, दुसऱ्याबाजूला सैन्य तैनाती सुद्धा वाढवत आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनने आणखी २० हजार सैनिक तैनात केले आहेत. त्याशिवाय शिनजियांग प्रांतामध्ये सुद्धा चीनने आणखी १० ते १२ हजार सैन्य सज्ज ठेवले आहे. ४८ तासात हे सैन्य भारताच्या हद्दीपर्यंत पोहोचू शकते. चिनी सैन्याच्या या सर्व हालचालींवर भारतीय लष्कराचे अत्यंत बारीक लक्ष आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
“पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीनने दोन डिव्हिजन तैनात केल्या आहेत. य़ामध्ये २० हजार सैनिक आहेत. उत्तर शिनजियांगमध्ये १० हजार सैनिक असलेली आणखी एक डिविजन तयार ठेवली आहे. नियंत्रण रेषेजवळील चीनच्या सैन्यतळापासून शिनजियांग एक हजार किलोमीटर अंतरावर आहे. पण ४८ तासात हे सैन्य भारताच्या हद्दीजवळ पोहोचू शकते” असे वरिष्ठ सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले.
आणखी वाचा- चीनची नवी खेळी, भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी
कालच चुशुलमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. पण प्रत्यक्षात नियंत्रण रेषेवर असे होताना दिसत नाहीय. उलट चीनकडून सैन्याची तैनाती वाढवली जात आहे. तिबेट भागामध्ये चीनच्या दोन डिविजन नेहमीच तैनात असतात. यावेळी भारताचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी दोन हजार किलोमीटर अंतरावरुन मेनलँड चायनामधून अतिरिक्त दोन डिविजन मागवल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.
आणखी वाचा- एकीकडे चीनची आगळीक, दुसरीकडे पाकने सीमेवर पाठवले २० हजार अतिरिक्त सैनिक
पाकने सीमेवर पाठवले २० हजार अतिरिक्त सैनिक
पाकिस्तान गिलगिट-बालटिस्तान भागात सैन्याची तैनाती करत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी चिनी लष्कराने अल बदर या दहशतवादी संघटनेबरोबर चर्चा केल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या उत्तरेला गिलगिट बाल्टिस्तान भागात पाकिस्तानने तैनातीसाठी २० हजार अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत. भारताची कोंडी करायची. एकाचवेळी भारतावर दोन्ही बाजूंनी हल्ला करण्याची संधी कधी मिळते? पाकिस्तान त्या प्रतिक्षेत आहे असे सूत्रांनी सांगितले.