बाटलीबंद पाण्यातून ९० हजार, तर श्वासावाटे सव्वा लाखांहून अधिक कण

जगभरात दिवसेंदिवस प्लास्टिकचा वाढता वापर हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. प्लास्टिकच्या अतिवापरातून  हजारो सूक्ष्मकण श्वासावाटे आणि तोंडावाटे माणसाच्या शरीरात जात असल्याचे एका संशोधनाच्या आधारे स्पष्ट झाले आहे.

जागतिक पर्यावरणदिनी बुधवारी ‘एन्व्हार्न्मेंट सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या नियतकालिकातील संशोधनपर लेखात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. या वर्षी संयुक्त राष्ट्रांनीही पर्यावरण दिनासाठी ‘हवेतील प्रदूषण’ हा विषय निवडला आहे. कॅनडातील संशोधकांनी या संदर्भात अमेरिकन लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास करून त्याद्वारे प्लाटिक प्रदूषणाचा अभ्यास केला आहे.

मायक्रोप्लास्टिक म्हणजेच प्लास्टिकचे सूक्ष्म कण. पूर्वी केलेल्या संशोधनात मानवी शरीरात प्लास्टिकचे कण हे अन्नपदार्थामधून मोठय़ा प्रमाणात जात असल्याचे आढळले होते. बाटलीबंद पाण्याच्या सर्वच उत्पादनांमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्मकण मोठय़ा प्रमाणात आढळले होते. आता हे कण मानवीनिर्मित उत्पादने जसे कृत्रिम कपडे, कारचे टायर किंवा कॉन्टॅक्ट लेन्स आदींमधून पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणात पसरले जात आहेत.

त्यातूनच जवळपास ५२ हजार प्लास्टिकचे कण मनुष्य वर्षभरात सेवन करत असल्याचे  संशोधकांना आढळले आहे. तर १ लाख २१ हजार कण श्वासांवाटे मनुष्याच्या शरीरात जातात. म्हणजेच दिवसाला ३२० कण. शिवाय ९० हजार कण हे फक्त बाटलीबंद पाण्याच्या सेवनातून पोटात जात असतात.

प्लास्टिक कण मानवी शरीरात जाण्याची संख्या ही तो कुठे राहतो, काय खातो यावर अवलंबून आहे. असे असले तरी प्लास्टिक सेवनाचा मानवी शरीरावर नक्की काय परिणाम होतो हे अजून संशोधकांना समजलेले नाही. मात्र प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण (१३० मायक्रोमीटर व्यासाहून कमी आकाराचे कण) मानवी उतींमध्ये जाऊन रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करू शकतात. तर इस्ट अँग्लिया विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राचे अभ्यासक अलास्टेअर ग्रँट यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये प्लास्टिक कण मानवी आरोग्याला हानिकारक आहेत असे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार किती आकाराचे प्लास्टिकचे कण मानवी फुफ्फुसात आणि पोटात जाऊ शकतात, आणि त्याचा नक्की काय परिणाम होऊ शकतो याचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करणे आवश्यक असून शरीरात प्लास्टिक कण जाऊ नयेत यासाठी प्लास्टिकचे कमीत कमी उत्पादन आणि वापर करणे हेच हितावह असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.