प्लुटोचा सर्वात मोठा चंद्र शॉरॉनहा न्यू होरायझन यानाने पहिल्यांदाच घेतलेल्या छायाचित्रात स्पष्टपणे दिसला आहे. हे छायाचित्र ८८.५ कोटी किलोमीटर अंतरावरून काढलेले आहे. नासाच्या प्लुटोच्या जवळ असलेल्या न्यू होरायझन या अंतराळयानाने अतिशय सुस्पष्ट असे हे छायाचित्र घेतले असून त्यात प्लुटो या बटू ग्रहाचा टेक्सासएवढय़ा आकाराचा हिमाच्छादित चंद्र दिसत आहे. त्याचे नाव शॉरॉन असे आहे.
अंतराळयानाच्या ९.५ वर्षांच्या प्रवासात प्रथमच एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून प्लुटो प्रणाली व कुईपर पट्टा यांच्या प्राथमिक पाहणीसाठी हे यान पाठवण्यात आले होते. प्लुटोचा सखोल अभ्यास करणे हा त्याचा मूळ हेतू आहे.
प्लुटोचे पाच चंद्र असून त्यातील शॉरॉन चंद्र प्लुटोपासून १९००० किलोमीटर अंतरावरून फिरत आहे. न्यू होरायझन यानातून तो दिसला तेव्हा ०.०१ अंश इतका दूर होता. ज्यांना अशा प्रकारची छायाचित्रे बघून त्याचे निरीक्षण करण्याचे प्रशिक्षण नाही त्यांना या चंद्राचे छायाचित्र हे फारसे चांगले वाटणार नाही पण श्ॉरॉनच्या पृथ्वीवरून काढण्यात आलेल्या छायाचित्रापेक्षा हे छायाचित्र जास्त चांगले आहे असे न्यू होरायझन्स प्रकल्पाचे वैज्ञानिक हॅल विव्हर यांनी सांगितले.
न्यू होरायझन्स अंतराळयानातून प्लुटो व श्ॉरॉन एकमेकांपासून वेगळे दिसत आहेत. ते अतिशय छान छायाचित्र आहे असे ते म्हणाले.
हे अंतराळयान अजून प्लुटोपासून ८८.५ कोटी किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर पृथ्वी व गुरू यांच्यातील अंतरापेक्षाही जास्त आहे.
न्यू होरायझन यानावरील लाँगरेंज रेकनसान्स इमेजर या उपकरणाने एकूण सहा छायाचित्रे टिपली आहेत त्यात तीन १ जुलैला तर उरलेली तीन ३ जुलैला काढली आहेत.
नॅव्हल वेधशाळेचे जेम्स ख्रिस्टी यांनी १९७८ मध्ये प्लुटोच्या या चंद्राचा शोध पस्तीस वर्षांपूर्वी लावला होता. आता तो प्रत्यक्ष छायाचित्रात दिसला आहे. यातून प्लुटो व शॉरॉनच्या पृष्ठभागाविषयी अधिक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. शॉरॉनची पहिली छायाचित्रे आहेत यानंतर दोन वर्षांनी आणखी चांगली छायाचित्रे मिळतील असा विश्वास या प्रकल्पातील आणखी एक प्रमुख संशोधक अ‍ॅलन स्टर्न यांनी व्यक्त केला आहे.