पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी नक्कल  करत आहेत. १९९० साली जे मी केले, तेच मोदी आता करीत आहेत. २५ वर्षांपूर्वी मी गावे दत्तक घेतली. गावोगावी शौचालये बांधली. सध्याच्या घडीला मोदी देशभरात जे काही राबवत आहेत, ते मीच आधीच करून ठेवले आहे, असे सांगतानाच समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव म्हणाले, की देशात केवळ स्वच्छता अभियान राबवून चालणार नाही, तर प्रथम गरिबी दूर करण्याची गरज आहे. अस्वच्छता आपोआपच नष्ट होईल.
 गावे दत्तक घेण्याविषयी मोदी बोलत आहेत; पण त्यांना कदाचित ठाऊक नसेल की, १९९० साली मी गावे दत्तक घेतली आणि त्यांचा विकास केला. त्यामुळे जे मी आधीच करून ठेवले आहे, त्याची पंतप्रधान माझी नक्कल उतरवत आहेत.
पंतप्रधानांनी विकासकामांची टिमकी वाजवणे थांबवून गरिबी दूर करण्याचे महत्त्वाचे अभियान हाती घ्यावी; तरच देशातील अस्वच्छता दूर होईल, असा दावा यादव यांनी केला.
वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात ते बोलत होते. अस्वच्छता दूर करण्याविषयी तुम्ही बोलत आहात; परंतु पहिल्यांदा गरिबी दूर करा. अस्वच्छता आपोआपच दूर होईल, असे ते म्हणाले.
या वेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना आणि खासदारांना किमान दोन गावे दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्याचा आणि नवा आदर्श घालून देण्याचा आदेशही त्यांनी या वेळी खासदारांना दिला.
अखिलेश यांना कानपिचक्या
राज्यात केवळ पायाभरणीच्या कार्यक्रमांबद्दल आपल्याला ऐकायला येते, त्यांच्या उद्घाटनाबद्दल काहीच नाही, अशी टीका करून मुलायमसिंह यादव यांनी राज्यातील विकास कार्यक्रमांच्या संथगतीबद्दल मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना जाहीररीत्या कानपिचक्या दिल्या. विकासाच्या अनेक योजना आपल्यासमोर आहेत; परंतु त्यांच्या कामाचा वेग अत्यंत संथ आहे, याकडे मुलायमसिंह यांनी लक्ष वेधले. योजनांच्या पायाभरणीबद्दल आपण ऐकत असतो; परंतु त्यांचे उद्घाटन करण्याची संधीच मिळत नसल्याचा टोला त्यांनी मारला. राज्याचे आपण मुख्यमंत्री असताना पायाभरणीऐवजी त्याचे उद्घाटन कसे होईल, याकडेच आपला भर होता, असेही मुलायमसिंह यादव यांनी सांगितले.