जदयूनंतर आता एआयडीएमकेही एनडीएच्या घटकपक्षांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अशातच आता याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. कॅबिनेटमध्ये बदल झाल्यानंतर भाजपमध्येही मोठे बदल होण्याची चिन्हं आहेत. काही मंत्र्यांना डच्चू देऊन संघटना बांधणीच्या कामासाठी धाडलं जाऊ शकतं अशीही शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॅबिनेट आणि संघटना बांधणीचे बदल याबाबत भाजपमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र २५ ऑगस्ट रोजी नव्या मंत्र्याचा शपथविधी होऊ शकतो अशी शक्यता आहे. जदयू आणि एआयडीएमके च्या प्रत्येकी दोघांना मंत्री पद मिळू शकतं अशीही शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ७१ मंत्री आहेत.

आता जर विस्तार झाला तर जास्तीत जास्त १० मंत्र्यांना पद दिलं जाऊ शकतं. बिहार कोट्यातून दोन मंत्रिपदं दिली जाऊ शकतात अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. सृजन घोटाळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. घोटाळेमुक्त सरकार अशी सध्याच्या सरकारची प्रतिमा आहे ती जपण्यासाठी काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येऊ शकतं अशीही माहिती समोर आली आहे.

सध्या कॅबिनेट मंत्रिपदांपैकी संरक्षण, माहिती आणि प्रसारण, गृहनिर्माण आणि शहरविकास ही खाती इतर मंत्र्यांकडे देण्यात आली आहेत. यामध्ये बदल होऊन ही खाती इतरांना दिली जाण्याचीही शक्यता भाजपच्या सूत्रांनी वर्तवली आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची एक बैठक थोड्याचवेळापूर्वी पार पडली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला उधाण आलं आहे.