रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारली; पंतप्रधान मोदींचा सबुरीचा सल्ला

लागोपाठ झालेल्या दोन अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पंतप्रधानांनी राजीनामा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा निर्णय न घेता ‘वाट पाहण्याची’ सूचना केल्याने प्रभू यांच्या भवितव्याबाबत दिवसभर उलटसुलट चर्चा होत राहिली. प्रभूंची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार की तोंडावर आलेल्या फेरबदलामध्ये खातेबदल होणार, याबद्दल उत्सुकता आहे. मोदींना भेटल्यानंतर प्रभू हे तत्काळ कोकणाकडे रवाना झाल्याचे समजते.

दुसरीकडे, प्रभूंना वाट पाहण्याचे सांगितले गेले असताना रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांचा राजीनामा त्वरित स्वीकारला गेला आणि त्यांच्या जागी तत्काळ अश्वनी लोहानी यांची नियुक्तीही केली गेली. लोहानी हे आर्थिकदृष्टय़ा घायकुतीला आलेल्या ‘एअर इंडिया’चे प्रमुख आहेत. पण त्यांची प्रतिमा कायापालट करणारी व्यक्ती अशी आहे.

‘गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वेमध्ये सुधारणा करण्यासाठी माझे रक्त आणि घाम आटविला. रेल्वेकडे अनेक दशकांपासून दुर्लक्ष झाले होते. पण अभूतपूर्व गुंतवणूकीमार्फत मी रेल्वेच्या आरोग्यामध्ये प्राण फुंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या संकल्पनेतील नव्या भारतातील रेल्वे यंत्रणा अत्याधुनिक व कार्यक्षम असली पाहिजे. त्यासाठी मी आखलेल्या मार्गावरून रेल्वे योग्य पद्धतीने निघाली आहे,’ असे सांगून प्रभू यांनी पुढे नमूद केले की,  ‘ रेल्वे अपघातांच्या दुर्दैवी घटनांनी, झालेल्या प्राणहानीने मला अतीव वेदना झाल्या. मी मोदींना भेटलो आणि अपघातांची सर्व नैतिक जबाबदारी स्वीकारली. त्यांनी मला वाट पाहण्यास सांगितले आहे.’

प्रभूंच्या खातेबदलाची चर्चा अधूनमधून होत राहिलेली आहे. मोदींना अपेक्षित असलेल्या पद्धतीने रेल्वेमध्ये कायापालट झाला नसल्याचे कारण त्यासाठी दिले जाते. पण तसे स्वत: मोदींनी कधीही सूचित न केल्याने त्याकडे दिल्लीतील नेहमीची ‘अटकळबाजी’ म्हणून पाहिले जात असे. मात्र, सलग झालेल्या दोन अपघातांनी ते अडचणीत आले. मोदींनी वाट पाहण्याची सूचना केल्याने प्रभूंच्या भवितव्याबद्दल तर्कवितर्क चालू झाले आहेत. चालू आठवडय़ामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल अपेक्षित आहे. त्यात आता प्रभूंच्या नावाची भर पडलेली आहे. ज्या वेगाने रेल्वे बोर्डाच्या नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली गेली, त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तो एक प्रकारचा ‘संदेश’ असल्याचे सांगितले जात आहे.

प्रभूंची ट्विट माहिती

अगोदर उत्कल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात २३ जणांचा बळी गेल्यानंतरच प्रभूंच्या राजीनाम्याची मागणी होऊ  लागली होती. पण प्रभूंनी कडक कारवाई करीत चार बडय़ा अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आणि काही जणांना निलंबित केले. वातावरण थोडे निवळत असताना उत्तर प्रदेशातीलच औरारियाजवळ अपघात झाला आणि प्रभूंवरील टीकेची धार वाढू लागली. त्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रभूंनी मोदींची भेट घेतली आणि अपघातांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यांनी तसे ट्विटरवरूनही जाहीर केले. पण त्यामध्ये ‘राजीनामा’ हा शब्द कोठेही वापरलेला नाही.

हे प्रभू..

  • तीन वर्षांमध्ये २८ मोठे रेल्वे अपघात
  • एकूण २५९ प्रवाशांचे मृत्यू. सर्वाधिक १९३ बळी १६-१७मध्ये
  • एकूण ९७३ जण जखमी
  • सुरक्षाविषयक सव्वा लाख कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

सुरेश प्रभूंच्या विनंतीवर पंतप्रधानच निर्णय घेतील. पण नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची कृती योग्य आहे. अशा प्रकारचे उत्तरदायित्व शासन व्यवस्थेमध्ये असले पाहिजे..  अरुण जेटली, अर्थमंत्री

अशाच पद्धतीने झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्रींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. दिल्लीतील विमान अपघाताची जबाबदारी स्वीकारून दिवंगत माधवराव शिंदे यांनीही मंत्रिपद सोडले होते. प्रभूंनीही राजीनामा दिला पाहिजे..  मनीष तिवारी, काँग्रेसचे प्रवक्ते

रेल्वे अपघातांच्या दुर्दैवी घटनांनी, झालेल्या प्राणहानीने मला अतीव वेदना झाल्या. मी मोदींना भेटलो आणि अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारली. त्यांनी मला वाट पाहण्यास सांगितले.   सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री

अश्वनी लोहानींकडे रेल्वे बोर्डाची धुरा

औरारियाजवळ झालेल्या अपघातानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांना हटविण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. पण त्याहीपेक्षा अतिशय वेगाने ‘एअर इंडिया’चे प्रमुख अश्वनी लोहानी यांची नियुक्ती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने केली. ‘टर्नअराऊंड स्पेशालिस्ट’ अशी ख्याती असलेले लोहानी हे रेल्वे सेवेचे अधिकारी. त्यांना दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातून एअर इंडियामध्ये आणण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने प्रथमच चालू नफा मिळविला; पण एकंदरीत आर्थिक तोळामासा प्रकृती लक्षात घेऊन त्याच्या खासगीकरणाची प्रक्रिया चालू झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यावर लोहानींना तिथून बाजूला काढून रेल्वे बोर्डाची धुरा दिली गेली.जुलैमध्येच मित्तल यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली गेली होती. मुदतवाढ मिळणारे ते पहिलेच बोर्ड अध्यक्ष होते. पण त्यांना अपघातानंतर बाहेरचा रस्ता दाखविला आहे.