फॅनी चक्रीवादळाने ओदिशाच्या किनारी भागांना जोरदार तडाखा दिल्याने, नुकसान झालेल्या भागांची हवाई पाहणी करण्यासाठी व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे दाखल झाले. फॅनीच्या तडाख्यामुळे आतापर्यंत ३५ जणांचा बळी गेला असुन, किनारपट्टीलगतच्या बहुतांश भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

भुवनेश्वर येथील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपाल गणेशी लाल व केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान यांची उपस्थिती होती.

मोदी पुरी, खुर्दा, कटक, जगतसिंगपूर, जजपूर, केंद्रपारा, भद्रक आणि बालसोर जिल्हा या भागांची हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी राज्य शासनाच्या अधिका-यांकडून मदत आणि पुर्नवसन कामांचा आढावा घेतला. त्यांनी या अगोदरच राज्यपाल गणेशी लाल आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना केंद्र सरकारकडून ओदिशाला सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले आहे.

फॅनी चक्रीवादळाने शुक्रवारी ओदिशाच्या किनारी भागांना जोरदार धडक दिल्यानंतर, या भागांमधील शेकडो नागरिकांना घर सोडावे लागले. पाणी टंचाईसह वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला लोकांना तोंड द्यावे लागले.