इराणवरचे अणुकार्यक्रमाशी संबंधित र्निबध उठवण्यात आल्याने त्या देशाशी विविध क्षेत्रात सहकार्य करण्याची मोठी संधी भारताला आहे, छाबहार बंदराच्या विकासाबाबतचा करार या दौऱ्यात होणार आहे ही महत्वाची बाब असून दोन्ही देश व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, ऊर्जा या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इराणच्या दौऱ्यावर येत असताना मुलाखतीत सांगितले.
इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी व अध्यक्ष हसन रोहानी यांच्याशी ते द्विपक्षीय संबंध, ऊर्जा व इतर मुद्दय़ांवर चर्चा करणार आहेत. येथे आल्यानंतर ते स्थानिक गुरूद्वारालाही भेट देणार आहेत. रोहानी व खामेनी यांच्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांना एक नवी दिशा मिळेल असे मत मोदी यांनी व्यक्त केले आहे. रोहानी यांनी मोदी यांच्यासाठी भोजनाचे आयोजन केले आहे.
छाबहार करार या भेटीत पूर्णत्वास जाणार असून भारत व इराण यांच्यातील सांस्कृतिक संबंधही वाढवले जाणार आहेत. छाबहार हे आग्नेय इराणमधील बेट असून पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तानकडे जाण्याचा मार्ग त्यामुळे खुला होणार आहे. अफगाणिस्तानशी भारताचे सुरक्षा व आर्थिक संबंध चांगले आहेत. छाबहार येथून सध्याच्या रस्तेमार्गाने अफगाणिस्तानात ८८३ कि.मी अंतर कापून जाता येईल. झरांद-देलाराम रस्ता २००९ मध्ये भारतानेच बांधून दिला असून त्यामुळे अफगाणिस्तानातील महामार्गाला लागता येते. त्यामुळे अफगाणिस्तातील हेरात, कंदाहार व मझार ए शरीफ या चार शहरात जाण्याचा मार्ग भारतासाठी खुला होणार आहे. मोदी हे रेट्रोस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट ऑफ इंडिया इराण रिलेशन्स या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलणार आहेत.
इराणवरचे अणुर्निबध उठल्यानंतर चीन व रशियाचे नेते इराणशी मैत्रीसाठी घुटमळत आहेत त्यामुळे भारताने आताची संधी गमावून चालणार नाही. याआधी तेल मंत्री धर्मेद्र प्रधान, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इराणला भेट दिली आहे.