जागतिक राजकारणात बेंजामिन नेतान्याहू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र समजले जातात. इस्त्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत नेतान्याहू यांनी प्रचारासाठी मोदींच्या फोटोचा वापर केला आहे.

इस्राईलमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. नेतन्याहू यांच्याकडे आघाडी होती मात्र इतर पक्षाशी त्यांची युतीही झाली नाही. त्यामुळे इस्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा निवडणूक होत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशिल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर नेतन्याहू निवडणूक प्रचारासाठी करत आहेत.

नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. बेंजामिन नेतान्याहू हे इस्त्रायलच्या ७१ वर्षाच्या इतिहासातील इस्त्रायलचे सर्वाधिककाळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरु शकतात.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ९ सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतान्याहून दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी इस्त्रायलमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. मोदी यांची भेट नेतान्याहू यांच्या फायद्याची ठरु शकते असं मानलं जात आहे. प्राचाराचा भाग म्हणूनच ही भेट होत असल्याची टिका नेतान्याहू यांचे विरोधक करत आहे.

‘नेतान्याहू यांची ही भारत भेट अवघ्या काही तासांची असेल. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. या भेटीत कोणतीही महत्वाची बैठक दोन्ही देशांमध्ये होणार नसून भविष्यातील व्यापारसंबंधी बैठकींसंदर्भात या बैठकीत एखादा निर्णय होऊ शकतो,’ अशी माहिती सुत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. इस्त्रायलमधील निवडणुकांआधी प्रचाराचा भाग म्हणून नेतान्याहू मोदींना भेटणार असल्याचा अंदाज काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.