पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षांत एक दिवसही सुट्टी घेतली नाही. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात एकही दिवस सुट्टी घेतली नाही, असे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सांगितले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात एक दिवसही सुट्टी न घेता सर्व वेळ जनतेच्या सेवेत घालवला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही एक दिवस सुट्टी घेतली नाही. त्यामुळेच देश आणि राज्य विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत,” असेही शर्मा म्हणाले. “खरा देशभक्त तोच आहे जो स्वतःसाठी नाही तर समाजासाठी काम करतो आणि अशी व्यक्ती बदल घडवून आणण्यास सक्षम असते. भारतीय जनता पक्ष जात आणि पंथाच्या नावावर भेदभाव करत नाही. गेल्या साडेचार वर्षात सरकारने चालवलेल्या सर्व योजना प्रत्येक विभागासाठी लागू केल्या गेल्या आणि लोकांना त्याचा लाभ मिळाला,” असंही शर्मा म्हणाले.

“भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेदभाव करत नाही, म्हणूनच या सरकारच्या कार्यकाळात (यूपीमध्ये) एकाच ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही. भाजप हा समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेण्यावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. पक्षाने आधी शेतकरी, नंतर ओबीसी गट आणि आता समाजातील प्रबुद्ध घटकांसोबत बैठका घेतल्या आहेत,” असंही शर्मांनी ग्रेटर नोएडातील एका कार्यक्रमात म्हटलं.

काँग्रेस दहशतवादाची जननी..

काँग्रेस ही भारतातील दहशतवादाची जननी आहे आणि ते भगवान राम यांच्यावरील लोकांच्या विश्वासाचा अपमान करतात, अशी खरमरीत टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. “देशाला दुखावणाऱ्या लोकांना देशवासियांना सहन करण्याची गरज नाही. काँग्रेस देशातील लोकांना रोग देतंय. तसेच ते प्रभू रामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा अपमान करून माफियांना आश्रय देते. तर याउलट भाजप नागरिकांना बरे करतो. आम्ही प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतो आणि माफियांना त्यांची जागा दाखवतोय. भाजप आहे तिथे प्रत्येकासाठी आदर आहे,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.