भारतातील बदलत्या परिस्थितीचा फायदा घेऊन चिनी उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन दौऱ्यात शनिवारी केले. या दौऱ्यात शनिवारी दोन्ही देशांच्या उद्योगपतींमध्ये २२ अब्ज डॉलरचे २६ करार झाले असून त्यात गौतम अदानी यांच्या ‘अदानी ग्रुप’ला आणि सुनील मित्तल यांच्या ‘भारती एंटरप्रायझेस’ला मोठा वाटा मिळाला आहे.
इंडिया-चायना बिझनेस फोरमच्या बैठकीत अलिबाबा, चायना लाइट, पॉवर, झियोमी, हुआवेई व ट्रायना स्टार सोलर या कंपन्यांसह २२ कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोदी यांच्याशी संवाद साधला. अदानी समूहाने ऊर्जा, बंदरे, विशेष आर्थिक पट्टा, औद्योगिक वसाहती व नैसर्गिक वायूनिर्मिती क्षेत्रात करार केले. भारती उद्योगाने दोन चिनी बँकांशी अडीच अब्ज डॉलरच्या वित्तपुरवठय़ाबाबत तसेच डाटा नेटवर्किंग विस्ताराबाबत करार केले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी रात्रीच मंगोलियात दाखल झाले. मंगोलियाला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान आहेत.

परदेशातही प्रचारी टीका
पंतप्रधान या नात्याने परदेश दौऱ्यावर असताना मोदी काँग्रेसवर टीका करण्याची सवय सोडत नाहीत, याचा प्रत्यय शनिवारी आला. मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर राहुल गांधी यांनी संसदेत टोला लगावला होता. त्या पाश्र्वभूमीवर  मोदी म्हणाले की, मी अविश्रांत काम करीत असल्यानेच माझ्यावर टीका होते. मी एकदाही सुटी घेतलेली नाही. माझ्या सरकारने वर्षभरात उत्तम कामगिरी केली असून एकही चूक केलेली नाही.