केंद्र सरकारने काल रात्री टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपसह एकूण ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने तणाव निवळण्यासाठी प्रयत्न केले. पण चीनने चर्चेच्या नावाखाली दगा दिला व सीमारेषेवर शस्त्रांसह सैन्याची जमवाजमव सुरुच ठेवली.

पँगाँग टीएसओ सेक्टरमध्ये फिंगर फोरपर्यंत चिनी सैन्य घुसले असून त्यांनी तिथे हेलिपॅडची सुधा उभारणी केली आहे. चीनचे हे सर्व वर्तन चिथावणी देणारे आहे. चीनच्या भूमिकेत बदल होत नसल्यामुळे अखेर भारताने काल चिनी अ‍ॅपवर बंदीचा निर्णय घेतला.

त्यानंतर लगेचच मोदी आज संध्याकाळी चार वाजता देशवासियांशी संवाद साधणार असे टि्वट करण्यात आले. त्यामुळे मोदी चीन संदर्भात काही मोठा निर्णय जाहीर करु शकतात अशी दिवसभर चर्चा होती. लष्करी पर्यायाऐवजी चिनी गुंतवणूक, आयातीसंदर्भात मोदी काही मोठे निर्णय जाहीर करतील अशी चर्चा होती. पण मोदींनी आपल्या काही मिनिटांच्या संबोधनामध्ये देशवासियांना करोनापासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. चीनचा साधा उल्लेखही केला नाही.