भारतात अद्यापही करोनाचा प्रसार कमी झालेला नाही. करोनावर कायमस्वरूपी उपाय म्हणून लसींची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील करोनाची सद्यपरीस्थिती या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी असणार आहेत. बैठकीत सरकारकडून नजीकच्या भविष्यकाळात करोनाच्या लसीचे वितरण करण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद या बैठकीत असणार आहेत. या मुद्द्याबाबत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका विशेष गोष्टीबाबत मोदींनी स्पष्टता द्यावी, असं मत व्यक्त केलं आहे.

काही दिवसांपूर्वी करोनावर तयार होणाऱ्या लसींच्या संशोधनाचा आणि विविध राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी काही मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी काही ठिकाणी भेट देऊन लसीवरील संशोधनाबाबत स्वत: जाऊन माहिती घेतली. आजच्या या बैठकीत याविषयी अधिकची माहिती देऊन प्रत्येक भारतीयाला करोनावरील लस मोफत स्वरूपात कधी उपलब्ध करून देणार याची पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टता करावी, असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

दरम्यान, बैठकीत सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान, अकाली दलाचे सुखबीर बादल, शिवसेनेचे विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद, बिजू जनता दलाचे चंद्रशेखर साहू, YSRCPकडून विजयसाई रेड्डी आणि मिथुन रेड्डी, MIMचे इम्तियाज जलील, JDUमधील आरसीपी सिंग, TMCचे सुदीप बंद्योपाध्याय आणि डेरेक ओ ब्रायन, AIADMKचे नवनीत कृष्णन, DMKचे टीआरके बाळू आणि तिरुची शिवा, JDSचे एचडी देवगौडा, समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव, बसपाकडून सतीश मिश्रा, राष्ट्रीय जनता दलमधून प्रेम चंद्र गुप्ता, TDPकडून जय गल्ला, आपचे संजय सिंग, TRSमधील नागेश्वर राव हे नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.