‘शांततामय आणि सौहार्दपूर्ण शेजार’ या आपल्या परराष्ट्र धोरणाशी सुसंगत अशी ‘समर्थ सार्क राष्ट्रां’ची संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या तीनही देशांच्या प्रमुखांशी बोलताना अधोरेखित केली. बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि श्रीलंकेचे महिंदा राजपक्से यांच्याशी स्वतंत्रपणे झालेल्या चर्चेमध्ये दहशतवादासह महत्त्वाच्या चिंताजनक प्रश्नांवर मोदींनी चर्चा केली.
संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या पहिल्याच भाषणात मोदी यांनी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला कोईराला यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शविला. तर सार्क देशांचे एका प्रबळ प्रादेशिक राष्ट्रांच्या गटात रूपांतर करण्यास संपूर्ण कटिबद्ध असल्याचे भारतीय पंतप्रधानांनी नमूद केले. जनकपूर आणि लुंबिनी या अनुक्रमे सीता आणि भगवान बुद्धांच्या जन्मस्थळी भेट देण्याची इच्छा असून आपण पुन्हा एकदा नेपाळला येऊ असे पंतप्रधानांनी नेपाळी पंतप्रधानांना सांगितले.
त्यापूर्वी श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्से यांच्याशी मोदींची ३० मिनिटे भेट झाली. योगविषयक प्रस्तावाला राजपक्से यांनीही अनुमती दर्शवली, तर मोदींनी सहकार्य वाढविण्यावर भर दिला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भारतीय पंतप्रधानांशी पहिलीच भेट झाली. या भेटीबाबत आपण समाधानी असल्याची भावना हसीना यांनी व्यक्त केली. भारत आणि बांगलादेश ही दोन्ही राष्ट्रे मूलतत्त्ववाद्यांच्या विरोधात एकत्र असतील, असे त्यांनी नमूद केले. या भेटीत तिस्ता नदी जलवाटपाचा प्रश्न व भू-सीमा करारांचे मुद्देही उपस्थित करण्यात आले व त्यावर पंतप्रधानांनी दिलेल्या उत्तरांमुळे समाधान झाल्याचे हसीना यांनी स्पष्ट केले.
‘तुमच्या आत्मविश्वासात परिवर्तनाची शक्ती’
‘आम्ही हे करू शकतो’ ही आजच्या तरुणांची विजिगीषू प्रवृत्तीच भारतात आणि जगात परिवर्तन घडवून आणू शकते,’ असे सांगत जगभरातील तरुणाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुतीसुमने उधळली. येथील भरगच्च रॉक संगीताच्या मैफिलीत पंतप्रधानांनी युवाशक्तीला साद घातली. सामान्यपणे पंतप्रधानांच्या परराष्ट्र दौऱ्यातील भेटीगाठींबाबत निर्माण झालेले सर्वमान्य निकष झुगारून लावत भारतीय पंतप्रधानांनी तरुणाईशी संवाद साधला. निळ्या रंगाचे नेहरू जॅकेट परिधान केलेल्या मोदी यांनी युवकांना इंग्रजीतून साद घातली. येथील सेंट्रल पार्कमध्ये ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हलसाठी जमलेल्या ६० हजारांपेक्षा अधिक जनसमुदायासमोर रॉक आणि जॅझ संगीताच्या तालावर पंतप्रधानांना व्यासपीठावर आणले गेले. ‘चहाची विक्री करणारा मुलगा, ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान’ अशी मोदींची ओळख प्रख्यात अभिनेते ह्य़ुघ जॅकमन यांनी करून दिली. मोदी यांनी सात मिनिटे इंग्रजीतून संवाद साधला. त्यानंतर संस्कृत भाषेतील शांतिसुक्तेही म्हटली. टाळ्यांच्या कडकडाटात मोदी यांनी अमेरिकी नागरिकांना ‘नमस्ते’ अशा शब्दांत अभिवादन केले. ‘तुम्ही उद्याचे भविष्य आहात. तुमच्या आजच्या कृतींवर उद्या आकारास येणार आहे. मला भविष्य आश्वासक वाटत आहे’, असे मोदी म्हणाले.