पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या चेक पोस्टचे उद्घाटन केले. यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी कर्तारपूर प्रकल्पासंदर्भात वेगाने काम करणाऱ्या पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे इम्रान खान यांचे अभार मानले. यावेळी त्यांनी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव य़ांची शिकवण केवळ शीख समुदायालाच नाही तर सर्व भारतीयांना प्रेरणा देणारी आहे असं मोदी म्हणाले.

कर्तारपूर कॉरिडोअरच्या भारतातील चेक पोस्टचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी शीख समुदायाशी संवाद साधला. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात पाकिस्तानचे आभार मानत असल्याचे सांगत केली. “मी पाकिस्तान सरकारचे तसेच पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानतो. भारतीयांच्या भावना समजून त्यांनी या प्रकल्पाचे त्वरित काम केले. इतकचं नाही मी या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचेही अभिनंदन करु इच्छितो,” असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच या चेक पोस्टच्या माध्यमातून हजारो श्रद्धाळूंची सेवा केली जाईल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

आपल्या भाषणामध्ये मोदींनी गुरु नानक यांचे कार्य केवळ भारतालाच नाही तर जगभरामध्ये एकता आणि बंधुभाव जपण्याची शिकवण देत असल्याचे मोदींनी सांगितले. शीख समुदायाच्या शिकवणीचा आज वेगवेगळ्या माध्यमातून जगभरामध्ये प्रसार केला जात असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. शीख समुदायसाठी महत्वाची धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी आठवड्यातून एकदा विशेष ट्रेन चावली जात आहे असं मोदी म्हणाले.

१५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्व आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात स्थित आहे. कर्तारपूर गुरुद्वार दरबार साहिबपर्यंत भारतीयांना दर्शनासाठी जाता यावे यासाठी भारतातील भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात जाता येणार आहे.