देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर असून, आज (रविवार) सकाळी ते भूतान येथील पारो विमानतळावर दाखल झाले. भूतानचे पंतप्रधान शेरींग टोबगे यांनी मोदींचे विमातळावर स्वागत केले. देशाच्या पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एखादा आंतरराष्ट्रीय दौरा करत आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल उपस्थित होते. यानंतर मोदी भूतानची राजधानी असणाऱ्या थिंपूकडे रवाना झाले. भूतान दौऱ्यात मोदी तानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचीही भेट घेणार आहेत. याचबरोबर भूतानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या इमारतीसाठी भारत सरकारने सुमारे ७० कोटींची मदत केली आहे. भारत आणि भूतान या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर या दौऱ्यात भर देण्यात येईल.